
गेल्या वर्षभरामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने भाजपचेही सेना आणि काँग्रेससमोर आव्हान राहणार आहे.
राजापूर (रत्नागिरी) : तालुक्यामध्ये निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका नव्या वर्षामध्ये होत आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व असलेल्या शिवसेनेसमोर भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीचे आव्हान राहणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामाच्या आखाड्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी आणि काँग्रेसच्या माजी विधानपरिषद सदस्य हुस्नबानू खलिफे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
मे ते जुलैदरम्यान मुदत संपलेल्या आणि कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या तालुक्यातील १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. तालुक्याच्या राजकारणात शिवसेना पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस, सेनेची पारंपरिक राजकीय विरोधक आहे.
हेही वाचा - आंबाप्रेमींनो यंदा तुम्हाला हापूसची वाट पाहावी लागणार ? -
तिसऱ्यांदा विधानसभेचे आमदार राहिलेले साळवी यांच्याकडे तळागाळात रुजलेले संघटनात्मक पाठबळ आहे. त्याच्या दिमतीला माजी आमदार गणपत कदम यांच्या नेतृत्वासह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य आणि तरुणांची मोठी फौज आहे. शिवसेनेची मोठी ‘व्होट बॅंक’ निमाण झाल्याने त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळविण्यामध्ये फारसे प्रयास करावे लागणार नाहीत.
अविनाश लाड यांच्या नेतृत्वाची साथ
काँग्रेसच्या माजी विधान परिषद सदस्य खलिफे यांचा विचार करता त्यांचाही तालुक्यात चांगला जनसंपर्क असून त्यांनी लाखो रुपयांची अनेक विकासकामेही केली आहेत. गावा-गावामध्ये काँग्रेसची संघटनात्मक ताकद आहे. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही हजारो मतांच्या फरकाने पराभूत झालेले कुणबी समाजाचे नेते अविनाश लाड यांच्या नेतृत्वाची साथ लाभणार आहे.
हेही वाचा - वाडीतील मुलीशी तुझे प्रेमसंबंध आहेत ? विचारणा करत धारदार हत्याराने तरुणावर केले वार -
भाजपची जोरदार मुसंडी
गेल्या वर्षभरामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने भाजपचेही सेना आणि काँग्रेससमोर आव्हान राहणार आहे. भाजपकडे नेतृत्वाचा मोठा वलयांकीत चेहरा नसला तरी शिवसेनेकडे विद्यमान आमदार साळवी आणि काँग्रेसकडे माजी आमदार खलिफे यांच्या रूपाने नेतृत्वाचा वलयांकीत चेहरा आहे. या दोघांच्या नेतृत्वाचा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कस लागणार आहे.
संपादन - स्नेहल कदम