चंद्रकांतदादा म्हणाले, 'येथे' आम्ही कापले शिवसेनेचे नाक...

Chandrakant Patil Comment On Shivsena Sindhudurg Marathi News
Chandrakant Patil Comment On Shivsena Sindhudurg Marathi News

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - भारतीय जनता पक्षाला दगा देणाऱ्या शिवसेनेचे नाक काढण्याचे काम सावंतवाडीच्या नूतन नगराध्यक्षांनी केले. नारायण राणे यांच्यामुळे या जिल्ह्याला एकप्रकारे ताकद मिळाली असुन हिच ताकद एक वर्षांपुर्वी मिळाली असती तर येथील चित्र वेगळे असते. राज्यात शिवसेनेने महाविकास आघाडी करुन आपले हिंदुत्व गुंडाळून ठेवल्याची टिकाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली. 

येथील बॅ. नाथ पै सभागृहात भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, नगराध्यक्ष संजू परब, ऍड. अजित गोगटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवलीत चूक केली तरी बसलो गप्प

श्री. पाटील पुढे म्हणाले, ""राज्यात आज अनैतिक पध्दतीने सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे त्यांना स्वर्गात दोन बोटे गेल्यासारखं वाटत असुन ते हवेत आहेत. या अशा वातावरणात कार्यकर्त्यानी खचून न जाता एक दिलाने काम केले पाहीजे. शिवसेनेचे नाक कोकण आहे; मात्र हेच नाक कापण्याचे काम संजू परब यांनी सावंतवाडीत केले. याठिकाणी विधानसभेला कुडाळ आणि सावंतवाडी हे दोन जागेवर भाजपला ए. बी फॉर्म द्या, असे जिल्हाध्यक्ष सांगत होते; मात्र त्यांनी गाय मारली म्हणुन आपण वासरु मारायचे नाही, या भावनेने आम्ही त्यांनी कणकवलीत चूक केली तरी गप्प बसलो; मात्र त्याचा पश्‍चाताप आज होत आहे.'' 

नागरिकता सुधारणा कायद्याबाबत हवी जनजागृती

ते पुढे म्हणाले, ""नागरिकता सुधारणा कायद्याबाबत लोकांमध्ये भीती दाखवली जात आहे; मात्र हा कायदा कोणाचे नागरिकत्व काढून घेण्याचा नाहीतर नागरिकत्व देण्याचा आहे. त्यामुळे या देशात राहणाऱ्या प्रत्येक लोकांच्या नागरिकत्वाचे रजिस्टर करण्यात येणार आहे. लोकांना ज्याप्रकारे भीती दाखवली जात आहे ती भीती दूर करण्यासाठी येणाऱ्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन हा कायदा व्यवस्थित पटवून सांगणे गरजेचे आहे.'' 

भाजपने आक्रमक होण्याची गरज 

नारायण राणे म्हणाले, ""भाजपने आता पक्षनिष्ठेबरोबरच आक्रमक होण्याची गरज आहे. शिवसेना भाजप युती व्हावी असे मला वाटत नव्हते; पण निवडणूकीनंतर शिवसेनेकडून दगा फटका केला गेला. युतीचा धर्म शिवसेनेने पाळला नाही हा त्यांचा स्वभावधर्म आहे. शिवसेना मला चांगल्याप्रकारे माहित आहे. जर बाळासाहेबांनी एकदा शब्द दिला असता तर तो पूर्ण झाल्याशिवाय राहिला नसता; मात्र आज शिवसेना सत्तेत असूनही ती सत्तेत नसल्यासारखी दिसत आहे. सत्ता शिवसेनेची नाहीतर राष्ट्रवादीची दिसत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातून आता शिवसेना संपवा, असे काम कार्यकर्त्यांनी करावे.'' 

23 वर्षांनी सावंतवाडीत यश

श्री. राणे म्हणाले, ""23 वर्षानी सावंतवाडी नगरपरिषदेवर यश मिळाले आहे. सर्वजण सोबत असल्याने यश मिळाले. पक्ष मजबूत करणे हेच ध्येय आता बाळगा. महाराष्ट्रातील चिंता करू नका. भाजप कोणत्या गोष्टीत कमी पडू नये, यासाठी आता भाजप कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता आली पाहिजे, हा गुण कार्यकर्त्यांमध्ये आणा.'' 

कोकण भाजपमय करण्याचा शब्द 

मी आज भारतीय जनता पक्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यामुळे आहे. येथे मी काही मिळवण्यासाठी किंवा वैयक्तिक स्पर्धा करण्यासाठी आलो नाही. त्यामुळे माझी स्पर्धा ही आता अन्य पक्षांशी आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून रायगडपर्यंत कोकण भाजपमय करण्याची हमी देतो, असे श्री. राणे म्हणाले. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com