तेरेखोल नदीतील खुबे कशामुळे झाले इतिहासजमा ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

या नदीत दोन प्रकारचे खुबे मिळायाचे. त्यात लाळये खुबे व दुसरे करमाळे खुबे. सह्याद्रीच्या रांगांमधून सुरू झालेली तेरेखोल नदी इन्सुलीपासून खूप मोठे रूप धारण करते. पुर्वी बांदा, कास, या भागात या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात खुबे मिळायचे.

बांदा ( सिंधुदुर्ग ) - तेरेखोल नदीतील रेतीच्या उत्खननामुळे एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या खुब्यांचे अस्तित्व पूर्णपणे संपले आहे. काससह परिसरात तसेच गोव्याच्या हद्दीत या नदीत मिळणार खुबे पूर्वी प्रसिद्ध होते; मात्र ते आता जवळपास विस्मृतीत गेले आहेत.

या नदीत दोन प्रकारचे खुबे मिळायाचे. त्यात लाळये खुबे व दुसरे करमाळे खुबे. सह्याद्रीच्या रांगांमधून सुरू झालेली तेरेखोल नदी इन्सुलीपासून खूप मोठे रूप धारण करते. पुर्वी बांदा, कास, या भागात या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात खुबे मिळायचे. गोव्याची हद्दही याला अपवाद नव्हती. गोव्यात सक्राळ तोरसेपासून सुरू झालेली तेरेखोल नदी सुमारे अठरा किलोमीटरपर्यंत केरी-तेरेखोलपर्यंत जाऊन समुद्राला मिळते.

हेही वाचा - एसटी प्रवाशाकडे हे असेल तर पैसेही बाळगण्याची गरज नाही 

दोन प्रकारचे खुबे

या नदीत दोन प्रकारचे खुबे मिळायचे. लाळये खुबे म्हणजे अर्धे पांढरे, फिकट काळे, वेगवेगळ्या रंगाची डिझाईन अशा रंगाचे. त्यात लाळे प्रमाणे जास्त बुळबुळीतपणा असल्याने या खुब्यांना लाळये खुबे असे नाव पडले. अत्यंत रुचकर असे हे खुबे. स्वयंपाकासाठी मसाला वापरुन अथवा मसाल्या शिवाय अशा कुठल्याही प्रकारे वापरता यायाचे. करमाळे खुबे हे रंगाने काळे. पण चवीला लाळये खुब्यापेक्षा काहीसे कमी म्हणून त्याचा स्वयंपाकात मसाल्याचा वापर करुन करत असत. नदीचे पात्र हे रेतीने भरल्यामुळे उथळ होते तर नदीत अनेक ठिकाणी भाटी (रेती साठून तयार झालेले ठराविक अशा अंतरापर्यंत रेतीचे उंचवटे) तयार होते. खुबे निर्मितीची प्रक्रिया ही रेतीवर व्हायची.

हेही वाचा - काँग्रेसच्या नेत्याकडून येथे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार

खुब्याची गोव्यासह कर्नाटकातही विक्री

खुबे खाण्यासाठी योग्य झाले की, ओहोटीच्यावेळी पाच सहा वर्षांपासूनच्या मुलांपासून दूरदूर गावचे अबालवृध्द अगदी सहजपणे आपणाला पाहिजे तेवढे खुबे गोळा करून घेऊन जायचे. अनेकजण पन्नास पंच्याहत्तर किलोच्या पिशव्याभरून खुबे काढून विकण्याचा व्यवसाय करायचे. खुबे खरेदीसाठी ट्रक टेम्पो यायचे. हे खुबे महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातच नव्हे तर गोव्यासह कर्नाटकमध्येही जायचे.

खुबे निर्मितीचे साधनच नष्ट 

तेरेखोल नदीत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात रेती काढण्यास प्रारंभ झाला. नदीतील रेती दर्जेदार असल्याने राज्यात बांधकामासाठी मागणीही मोठ्या प्रमाणात होती. रेती काढण्यासाठी कसल्याही अटी पाळल्या जात नव्हत्या. संबंधित खात्याशी रेती व्यावसायिकांचे साटेलोटे होते. त्यामुळे या व्यवसायावर कुणाचेही नियंत्रण नव्हते. अशा प्रकारे रेतीचा अनियंत्रित व्यवसाय सुरू झाल्यावर अगोदर उथळ असलेली नदी खोल होत गेली. जेव्हा नदीत सहजपणे रेती मिळणे कठीण होऊ लागले, तेव्हा रेती व्यावसायिकांनी भाटीकडे मोर्चा वळविला. भाटी नष्ट होत गेल्या. खुबे निर्मितीचे साधनच नष्ट झाले. त्यामुळे हे खुबे आता इतिहासजमा झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khube Disappear From Terekhol River Sindhudurg Marathi News