मच्छीमारांच्या समस्येत पावसाळी वातावरणाची भर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

गेले दोन दिवस किनारपट्टीवर पावसाळी वातावरण तयार होऊन हलका पाऊस पडत आहे.

देवगड (सिंधुदुर्ग) : तालुक्‍याच्या किनारपट्टी भागात पावसाळी मळभ दाटू लागली आहे. त्यामुळे मच्छीमारी हंगाम पुन्हा एकदा समस्यांच्या गर्तेत सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेले दोन दिवस किनारपट्टीवर पावसाळी वातावरण तयार होऊन हलका पाऊस पडत आहे. जोडीला विजांचा लखलखाट असल्याने अनेकांची भीतीने गाळण उडाली आहे.

हेही वाचा - सागरी सुरक्षेची पकड होणार आणखी मजबूत ; १५ दिवसांत दोन स्पीड बोटी - 

मध्यंतरी परतीच्या पावसाने किनारपट्टी भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. समुद्रातील वातावरण बिघडल्याने स्थानिक मच्छीमारी नौका बंदरात थांबून होत्या. त्यातच सुरक्षितता म्हणून गुजरात आणि मुंबई येथील मच्छीमारी नौका येथील बंदरात आश्रयाला आल्या होत्या. जोराच्या पावसामुळे भात कापणीमध्ये व्यत्यय आला होता. तसेच झोडणी करून झालेले गवत सुकण्यामध्ये अडचणी जाणवल्या.

वीजांच्या लखलखाटामुळे अनेकांच्या घरगुती उपकरणांची मोठी हानी झाली. त्यामुळे येथील शहरात गडगडाटाची भीती निर्माण झाली होती. परतीच्या पावसामुळे मासळी हंगामाबरोबरच भातशेती अडचणीत सापडली. त्यानंतर वातावरण निवळून मच्छीमारी हंगाम पूर्वपदावर येत होता. शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरवात केली होती. आता पावसाळी संकट टळले असे वाटत असतानाच पुन्हा किनारपट्टी भागात पावसाळी मळभ दाटू लागली आहे. 

हेही वाचा - दिव्यांगांनी दिवाळीसाठी बनवलेल्या वस्तु मिळणार आता ऑनलाइन -

दोन दिवसांपासून पाऊस

गेले दोन दिवस किनारपट्टी भागात हलका पाऊस पडत आहे. त्यातच अधूनमधून विजा चमकत असल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाल्याचे चित्र होते. पावसामुळे पुन्हा एकदा मच्छीमारी हंगाम ठप्प होण्याची भीती व्यक्‍त केली जात होती. दरम्यान, अजून दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहील, असा स्थानिक जाणकारांचा अंदाज आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: changing the rainy atmosphere increases the problem of fishing person in ratnagiri and konkan area