ग्रामस्थ झाले चकित अन् अधिकारी झाले घामाघूम ; सीईओ पोहोचल्या थेट वाडीच्या घरात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

वाडीवाडीत घराघरांत फिरून त्यांनी लाभार्थींकडून माहिती घेतल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांना घाम फुटायचीच वेळ आली होती.

चिपळूण (रत्नागिरी) : सरकारी पाणीयोजना अपयशी म्हणून अपांगे वाडीने स्वतः बनवलेली खासगी पाणीयोजना उत्तम चालते, मग सरकारी योजना का अपयशी ठरतात याचा अभ्यास करा, तशा छोट्या योजना गावागावांत राबवा. मोठ्यांना फाटा द्या, अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिल्या. वाडीवाडीत घराघरांत फिरून त्यांनी लाभार्थींकडून माहिती घेतल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांना घाम फुटायचीच वेळ आली होती.

डॉ. जाखड यांनी कोसबी नळपाणी योजनेच्या चौकशीसाठी आकस्मिक भेट दिली. तेथील अपांगे वाडीला पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांनी खासगी योजना केल्याचे एका वाडीतील ग्रामस्थांनी सांगितले. तेव्हा ती योजना प्रत्यक्ष जाऊन सीईओंनी पाहिली. त्यासाठी घरोघरी फिरल्या. योजना कशी राबवली याची माहिती घेतली. इंजिनिअर कोण होते विचारता, सारे गावकऱ्यांनीच केल्याचे सांगितले तेव्हा सीईओंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ग्रामस्थ योजना यशस्वी करतात तर तुमच्या का होत नाहीत? असा सवाल केला.

हेही वाचा - ग्रामस्थांनी वनविभाग आणि पोलीसांच्या मदतीने जीवनदान दिले

डॉ. जाखड स्व. निकम यांच्या जयंतीनिमित्त आल्या. तेथून त्या कोसबी नळपाणी योजनेच्या चौकशीसाठी दाखल झाल्या. सोबत बीडीओ राऊत आणि पाणीपुरवठा अधिकारी होते. पाइप जागेवर नाहीत, टाकी आहे की नाही, असेल तर कुठे आहे याचा शोध घेतला. पिण्यासाठी आता व्यवस्था काय विचारता अधिकारी निरुत्तर झाले. यावर दोषींवर कारवाई होईल; मात्र लोकांना 
नियमित पाणी मिळणे महत्वाचे आहे, असे सुनावले.

घराघरांत फिरून माहिती घेतली

सीईओंनी घरकुल, गरोदरमाता तसेच अन्य योजनांची माहिती त्या त्या ठिकाणी जाऊन घेतली. प्रत्यक्षात सीईओच चौकशी करत असल्यामुळे अधिकारी, कर्मचारी धास्तावले होते. सीईओ मधलीवाडी, डिकेवडी, गुजरवाडीला चालत पोचल्या. घराघरांत जाऊन महिलांशी चर्चा केली. चार तास त्यांनी गावात फिरून रस्ता, पाणी आणि अन्य योजनांची माहिती घेतली. अधिकारी आणि ग्रामस्थही हे सारे बघून चकित झाले. घाणेकरवाडी, डिकेवडी, वाडेकरवाडी, गोताडवडी, निचोरवाडी या वाड्यांचा योजनेसाठी तत्काळ प्रस्ताव देण्याची सूचना केली.

हेही वाचा -  कोल्हापूरकरांचा नाद नाही करायचा गड्या,एका श्वानप्रेमींनी काय केलंय बघा -

दृष्टिक्षेपात...

  •  चार वाड्यांतून 
  • चार तास पायपीट
  •  घराघरांत जाऊन लाभार्थ्यांशी संवाद
  •  पाणीयोजनेचे 
  • पाइप जागेवर नाहीत
  •  टाकी शोधायची कुठे?

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: checking of water policy CEO go and check from home to home in chiplun ratnagiri