या जगात कोण काय करेल याचा नेम नाही, कोल्हापूरकरांची तर बातच न्यारी 

सुयोग घाटगे 
Wednesday, 20 January 2021

तसा कोल्हापूरकरांचा हौस करण्यातही कोणी हात धरणार नाही. एका श्वानप्रेमींनी काय केलंय बघा.

कोल्हापूर  : या जगात कोण काय करीन याचा नेम नाही. कोल्हापूरकरांची तर बातच न्यारी. केवळ माणसंच फॅशन करतात, असं नाही. घरातील कुत्री, जनावरंही हल्ली रॅम्प वॉक करतात. म्हशीही ब्युटी पार्लरला जातात. कोल्हापूरत तशी ब्युटी पार्लर सुरू झालीत. त्यामुळंच म्हणतात, कोल्हापूरकरांचा नाद नाही करायचा गड्या.

तसा कोल्हापूरकरांचा हौस करण्यातही कोणी हात धरणार नाही. एका श्वानप्रेमींनी काय केलंय बघा. कोणी ही भूतदया म्हणेल कोणी काही. ते काहीही असलं तरी या माणसाने काय केलंय ते तरी बघा.

हल्ली जन्मदात्यांनाही अनाथाश्रमात टाकून देतात. त्यांच्याकडे डुंकूनही पाहत नाहीत. पण या जगात काही लोकं अशी आहेत ते या जीवसृष्टीतील जीवजंतूचाही विचार करतात. कोल्हापूरात अशीच एक केअर नावाची संस्था आहे. ती कुत्र्यांचा सांभाळ करते.  केअर  संस्थेचे सदस्य मिलिंद जगनाडे यांनी श्वानाला नवजीवन दिले.

त्याचे असे झाले: काही महिन्यांपूर्वी एक पाळीव श्वानाचा अपघात झाला. या अपघातात या श्वानाला लुळेपण आले. शरीराचा मागील भाग कमरेतून निकामी झाल्यामुळे हे श्वान जागचे हलणेदेखील कठीण झाले. घरी हौसेने आणलेल्या श्वानांची ही हालत झाल्याने त्याच्या मालकाने या श्वानाला कोंडाळ्यात फेकून दिले. अगदी मृत्यूशी लढणाऱ्या या श्वानाला  संस्थेचे सदस्य मिलिंद जगनाडे संस्थेने आधार दिला. अनेक दिवसांच्या उपचारानंतर या श्वानाचे जीव वाचवण्यात यश आले. 

 हे श्वान या अपघातामुळे कायमस्वरूपी अपंग झाले. जागचे हलणेदेखील कठीण झाल्यामुळे जखम होण्याचा आणि त्याला इन्फेक्शन होण्याचा धोका वाढला. अशातच हे श्वान हालचाल करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी सातत्याने धडपडत होते. या मुळे या श्वानासाठी पांगुळगाडा(व्हीलचेअर) बनवण्याचा विचार मनात आला. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत कोल्हापुरातील नामांकित औद्योगिक कारखान्याने यासाठी व्हीलचेअर बनवली आहे. या व्हील चेअरमध्ये ,आगीत दोन्ही पाय झोळीमध्ये अडकवून कंबरेला पट्टीने बांधले जाते. या व्हीलचेअरवर बसवल्यानंतर पुढील पायाच्या जोरावर ते संपूर्ण परिसरात मुक्तसंचार करत आहे.

हेही वाचा- अस्सल संगमेश्‍वरी बोलीतील गूढकथा ; साध्या-भोळ्या शेतकरी गावकऱ्यांची कला

जीवित राहणे कठीण असताना हे श्वान जगले आहे. अनेक प्रयत्न आणि उपचारानंतर ते बरेही झाले.  व्हीलचेअरच्या आधाराने चालतंय. हे दृश्य वेदनादायी असले तरी काही अंशी सुखावणारे आहे. कदाचित एखाद्या अपघातग्रस्ताची काळजी घेतली जाणार नाही, तेवढी काळजी केअर संस्थेने या श्वानाची घेतली.    
 
संयोगिता देसाई- माने ( संस्थापिका, केअर )

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: handcapped dog story kolhapur After many attempts and treatment dog healed