नाणारबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिकाही बदलेलः प्रवीण दरेकर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

दरेकर चिपळूण दौऱ्यावर असता त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपची कृषी कायदा व कोकण विकासाबाबत भूमिका मांडली राज्यातील आघाडी सरकार, शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.

चिपळूण ( रत्नागिरी ) -  नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका बदलेल. त्या दृष्टिकोनातूनच शिवसेनेची हालचाल दिसत आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले. शिवसेनेने कोकणचा भ्रमनिरास केला असून आता नाणारबाबत सकारात्मक भूमिका घेऊन येथील रोजगाराचा प्रश्न सोडवावा, असे आवाहन त्यांनी केले. 

दरेकर चिपळूण दौऱ्यावर असता त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपची कृषी कायदा व कोकण विकासाबाबत भूमिका मांडली राज्यातील आघाडी सरकार, शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरेकर म्हणाले, केंद्राने आणलेल्या कृषी विद्येयकाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणूनबुजून गैरसमज पसरवले जात असून प्रत्यक्षात हा कृषी कायदा शेतकऱ्याच्या हिताचा आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे अपयशी सरकार असून प्रत्येक क्षेत्रात हे सरकार निष्फळ ठरले आहे. कोकणाकडे तर या सरकारचे अजिबात लक्ष नाही. कोकणात एक ही नवा प्रकल्प या सरकारने आणला नाही.

कोकणाच्या विकासासाठी निधी देखील हे सरकार देऊ शकलेले नाही. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका संशयास्पद असून आरक्षण देता येणार नाही हे लक्षात आल्यावर सरकारने इडब्ल्यूएस चे आरक्षण देऊन सरकार पळ काढत आहे. अशा आरक्षणाचा कोणताही उपयोग मराठा समाजाला होणार नाही. अशी पळवाट काढून सरकार मराठा आरक्षणासाठी शाहिद झालेल्यांचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

अजित पवार यांनी मी येईन जाईन या विषयावर बोलूच नये. कारण राजकारणात येणे जाणे ही प्रक्रिया नेहमीच सुरू असते आणि स्वतः अजितदादांनी ते आपल्या भूमिकेने दाखवून दिले आहे. संजय राऊत हे केंद्र आणि राज्य असा वाद तेवत ठेवण्याचा प्रयत्न सतत करत आहेत. ही त्यांची भूमिका दुर्दैवी असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये, असेही दरेकर म्हणाले. 

सर्व निवडणूका स्वबळावर 
या पुढे भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा दरेकर यांनी केली. कोकणातील ग्राम पंचायत आणि पालिका निवडणुका स्वबळावर लढवून कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल आणि या निवडणुकांमध्ये देखील भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister role regarding Nanar will also change Praveen Darekar Comment