esakal | दिव्यांग कुटुंबाला पाच वर्षांच्या श्रेयसचा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Three Brothers Strive To Bring Light To The Blind Family

बाल दिन साजरा होताना श्रेयस करंडे याची पाच वर्षांची कामगिरी समोर आली आहे. आई-वडील व काका व काकू या चौघांसाठी श्रेयस डोळे बनला आहे.

दिव्यांग कुटुंबाला पाच वर्षांच्या श्रेयसचा आधार

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

देवरुख :  माळवाशी येथील दिव्यांग बांधव अंकुश करंडे, सीमा करंडे, अनंत करंडे, आरती करंडे यांना पाच वर्षांचा श्रेयस करंडे मार्ग दाखवण्याचे काम करत आहे. लहान वयातच त्याच्यावर आलेली ही मोठी जबाबदारी तो लिलया पार पाडत आहे. आज बाल दिन साजरा होताना हे बालक समाजासाठी आदर्श ठरणारे आहे. श्रेयसबरोबरच त्याची भावंडे तेजस्विनी आणि श्रावणी ही देखील कौतुकास पात्र ठरत आहेत. 

बाल दिन साजरा होताना श्रेयस करंडे याची पाच वर्षांची कामगिरी समोर आली आहे. आई - वडील व काका व काकू या चौघांसाठी श्रेयस डोळे बनला आहे. या चौघांसाठी तो पांढरी काठी बनला आहे. श्रेयस हा चार वर्षांचा असल्यापासून या चौघांना घेऊन तो लिलया प्रवास करतो. माळवाशी ते देवरुख व देवरुख ते मुंबई या प्रवासात श्रेयस पुढे असतो व त्याच्या आधाराने चौघे दिव्यांग हे प्रवास करताना दिसतात. एस. टी. रेल्वे, रिक्षाने प्रवास करताना श्रेयसला वयाची कोणतीही अडचण येत नाही हे विशेष. या प्रवासात नागरिकांनाही लहानग्या श्रेयसची कमाल वाटते. 
करंडे बंधू वांगणी कर्जत येथे राहतात. तेथे सर्वच अंध बांधव वास्तव्यास आहेत. रेल्वेतून फेरीवाले बनून हे करंडे बंधू व्यवसाय करतात.

आई-वडिलांसह दिव्यांग काका-काकूंना आधार 

लहान वयातच त्याने संवादाची कला आत्मसात केली आहे. ऐकून-विचारून तो कुठे जायचे आहे तो मार्ग तो विचारून घेतो व तसे या चौघांना बरोबर घेऊन जात असतो. श्रेयस बरोबरच तेजस्विनी व श्रावणी यासाठी योगदान देत असतात. लहान वयातच या चौघा दिव्यांगांना सांभाळण्याची जबाबदारी ही तीन लहान मुले पार पाडत आहेत. श्रेयसला आता शाळेचीही आवड निर्माण झाली आहे. 
 
कुटुंबाचे स्वप्न साकरण्यासाठी मदतीची गरज 
अभ्यास करून आपण मोठे होणार व आई बाबांना गाडीतून फिरवणार, असे तो त्याच्या भाषेत बोलत असतो. त्याचे हे स्वप्न साकार करण्यासाठी समाजातील दानशुरांनी मदतीचा हात पुढे केला तर श्रेयसचे हे स्वप्नही पुरे होणार आहे. बालदिनानिमित्त श्रेयस, तेजस्विनी, श्रावणीची ही गोष्ट लहान मुलांसाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे. दिव्यांग कुटुंबाला उजेड दाखविण्यासाठी ही तीन भावंडे धडपड करत आहेत.