कोकणातील 'या' धरणाला लागलीय गळती...

chinchali dam in danger condition because of leakage
chinchali dam in danger condition because of leakage

रत्नागिरी (मंडणगड) - गळतीमुळे धोकादायक झालेल्या तालुक्‍यातील चिंचाळी धरणाच्या पाण्याने डिसेंबर महिन्यातच तळ गाठला आहे. ४० वर्षांनंतरही हा प्रकल्प अपूर्ण असून लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही उपयोगशून्य धरणामुळे या परिसरात ओलिताखाली येणाऱ्या गावांतून बारमाही शेती करू पाहणारा शेतकरी नाउमेद आहे. त्यामुळे धरण नेमकं कशासाठी, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

धरण होतंय धोकादायक

१९७९ ला चिंचाळी धरण बांधण्यास सुरवात झाली. २.१४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा साठवण्याची क्षमता असलेल्या या धरण परिसरातील १३८ हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येण्याची अपेक्षा होती. त्यासाठी सुमारे १० कोटींच्यावर खर्च करण्यात आला आहे. ४० वर्षांनंतर तांत्रिक दोषांमुळे ते आजही पूर्ण झालेले नाही. याला कारण स्थापत्यशास्त्रातील तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे की, यंत्रणेला लागलेल्या गळतीमुळे हे गुलदस्त्यात आहे. चिंचाळीच्या परिसरात चिंचाळी, पन्हळी खुर्द, कुंभार्ली, सालीवाडा, रोहिदासवाडी, लोकरवण, म्हाप्रळ, म्हाप्रळ मोहल्ला, बंदरवाडी, नवानगर अशी गावे आहेत. प्रकल्पाची कागदावरील उपयुक्तता अभिनंदनीय होती. मात्र, जसे धरणाचे काम रखडले होते, त्याप्रमाणे कालव्यांचे कामही अपूर्ण आहे. पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत असून हे धरण धोकादायक असल्याचे संबंधित विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 
बारमाही शेतीसाठी पाण्याचा उपयोग नाही.

लाभक्षेत्रात धरणाच्या खालच्या भागात राहणारे शेतकरी यांना बारमाही शेतीसाठी धरणातील पाण्याचा उपयोग होत नाही. मुख्य महामार्गावर हे धरण असून पर्यटक, नागरिक गर्दी करतात. मात्र, चौकीदारच नसल्याने धरणाची सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह आहे. मंडणगडात या विभागाचे एकही कार्यालय नाही. एखादी तक्रार अथवा सूचना करायची असेल तर खेड किंवा दापोलीला जावे लागते.

धरणात साचला प्रचंड गाळ

चिंचाळी धरण अनेक डोंगरांच्यामध्ये बांधण्यात आले आहे. या डोंगर उतारावरून, ओढ्यांवाटे पावसाच्या पाण्यासोबत वाहून आलेली माती, दगडधोंडे यामुळे प्रचंड गाळ साचला आहे. परिणामी, पाण्याची क्षमता घटली आहे. गाळ काढून पुन्हा खोली वाढवण्याचे काम करावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com