Chiplun: आमचे उमेदवार आम्हीच ठरवू : काँग्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस

आमचे उमेदवार आम्हीच ठरवू : काँग्रेस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : गेल्या पालिका निवडणुकीत आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असताना आमचे उमेदवार कोण असावेत, या आमच्या पक्षांतर्गत निर्णयात राष्ट्रवादीने हस्तक्षेप केल्यानेच आघाडी होऊ शकली नाही. पालिकेसाठी आमचे उमेदवार आम्हीच ठरवू. आघाडीबाबत आम्ही नेहमीच सकारात्मक असतो. चर्चा फिस्कटवण्याच्या मानसिकतेतून बैठका होणार असतील तर आघाडी तुटल्याचे खापर आमच्या माथी मारू नये. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षासोबत आघाडी व्हावी, अशीच आमची भूमिका असल्याचे मत काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे यांनी व्यक्त केले.

आघाडीबाबत लब्धे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला कमी लेखल्यामुळे आघाडी होऊ शकली नाही; मात्र पक्षाची पालिकेमधील सदस्य संख्या वाढली. २००६ ला झालेल्या निवडणुकीत अशीच आडमुठी भूमिका घेण्यात आली. परंतु त्या वेळी काँग्रेस पक्षाच्या हेमलता बुरटे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या हे लक्षात घेतले पाहिजे. देशाचा विचार करताना केंद्रातील भाजप सरकार सर्व आघाड्यांवरती सपशेल नाकाम ठरले आहे.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

महागाई गगनाला भिडली आहे, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात जनतेच्या हितासाठी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती एकेक करून मोदी सरकार आपल्या जिवलग उद्योगपतींना विकत आहे. समाजातील गरीब, कामगार, शेतकरी, व्यापारी उद्योजक या घटकांना जगणे व आपले कामकाज चालवणे अशक्य झाले आहे. याची जाणीव सर्वांना झाली आहे. चिपळूणसह कोकणात आलेला पूर आणि त्यावरती अभ्यासपूर्ण उपाययोजना करण्यासाठी जे जे शक्य असेल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वांच्या साथीने करणार आहोत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी याकरिता पुन्हा प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत दोन्ही बाजूंची कोअर कमिटीची बैठक झाली. काँग्रेसकडून यासाठी संजय रेडीज, इब्राहीम दलवाई, प्रशांत यादव, लियाकत शहा, सुरेश पाथरे हे कोअर कमिटी सदस्य तसेच उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे व नगरसेवक कबीर काद्री उपस्थित होते.

आघाडीकरिता आम्ही सकारात्मक आहोत. सन्मानजनक तोडगा वेळेवरती निघाला तर आघाडी निश्चितपणे होईल. सध्या काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक प्रभागात बैठका सुरू आहेत. त्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

- भरत लब्धे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष

loading image
go to top