मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi

मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली : पूर्वी बळकावलेल्या भारतीय भागात चीनने अवैध बांधकाम केल्याची परराष्ट्र मंत्रालयाची कबुली आणि चीनी घुसखोरी झालीच नसल्याचे सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांचे वक्तव्य या विरोधाभासावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, “ सरकारकडे स्पष्ट रणनीती नसून मि. ५६ इंची घाबरले आहेत", अशा शब्दात पंतप्रधान मोदींना पुन्हा लक्ष्य केले. या मुद्द्यावरून सातत्याने केंद्रावर प्रहार करणाऱ्या राहुल यांनी आज आक्रमक ट्विट केले. आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी गुन्हेगारी स्वरूपाचा खेळखंडोबा सुरू आहे. प्राण पणाला लावून सीमेचे संरक्षण करणाऱ्या जवानांप्रती पूर्णपणे आदर आहे. मात्र केंद्र सरकारचे सतत खोटे बोलणे सुरूच आहे, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा: "मूठभर लोकं देशभक्त मुसलमानांना बदनाम करताय"

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही खोचक ट्विटद्वारे सरकारला लक्ष्य केले. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे, की अरुणाचलमधील चिनी गावाबद्दल सरकारने अखेर तोंड उघडले असून चीनचा बेकायदेशीर ताबा मान्य होणार नाही असे म्हटले आहे. मोदीजी तुम्ही याविरुद्ध काही कारवाई करणार की केवळ अमान्य आहे असे म्हणत राहणार, या (चिनी) गावातील घरे पंतप्रधान चीनी आवास योजनेतून बांधण्यात आली आहेत काय?

चीनने गाव वसविल्याच्या अमेरिकी संरक्षण संस्था पेंटॅगॉनच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काल म्हटले होते की चीनने काही दशकांपूर्वी अवैधपणे बळकावलेल्या भारतीय भूभागात बांधकाम केले आहे. अशा प्रकारे बेकायदा भूभाग बळकावण्याला आणि चीनच्या अवास्तव दाव्यांना भारताने कधीही मान्यता दिलेली नाही. सरकारने राजनैतिक पातळीवर याचा कठोर शब्दात विरोध दर्शविला आहे आणि यापुढेही केला जाईल.

हेही वाचा: "कंगनाचं ते वक्तव्य चुकीचं पण..."; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

दुसरीकडे सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांनी मात्र चीनी सैन्याची भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी झाल्याचा इन्कार केला होता. त्यांनी म्हटले होते की भारतीय हद्दीत चीनने गाव वसविल्याच्या दाव्यांमध्ये सत्यता नाही. हे गाव ताबारेषेवर चीनच्या हद्दीमध्ये असल्याचेही रावत यांनी म्हटल्याने वाद वाढला आहे.

loading image
go to top