
शिवसेनेच्या नगरसेवकांनी मांडलेल्या ठरावाला सहकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला नाही त्यामुळे यावर मतदान झाले.
भाजप-सेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा : नावावरून आघाडीत बिघाडी
चिपळूण: गेले वर्षभर महाविकास आघाडीच्या माध्यमातून पालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकजुटीने भाजप विरोधात काम करीत आहेत; मात्र एका नामकरण ठरावावरून आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी मांडलेल्या ठरावाला सहकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला नाही त्यामुळे यावर मतदान झाले. अखेर भाजपच्या मदतीने हा ठराव ९ विरुद्ध ७ असा संमत झाला.
येथील पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. या सभेत स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याच्या नामकरणाचा प्रस्ताव ठेवला होता. शहरातील बहुचर्चित स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याचे काम अजूनही शिल्लक आहे. त्यासाठी नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे; मात्र त्या आधी या रस्त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक शशिकांत मोदी यांनी सभेत मांडला होता. याचवेळी पाग येथील आरक्षण क्र. ५२ मधील उद्यानासाठीही माजी नगराध्यक्षा अण्णासाहेब जोशी यांचे नाव देण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता.
हेही वाचा: बँक निवडणूक : सात जागांसाठी 14 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
उद्यानाच्या प्रस्तावाला सदस्यांनी एकमुखी मंजुरी दिली; मात्र मार्कंडी येथील स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याला हेडगेवार यांचे नाव देण्यास काहींनी असहमती दर्शवली. अखेर या विषयी ठराव मांडण्यात आला. ठरावाच्या बाजूने सेनेतील नगरसेवक मोहन मिरगल, शशिकांत मोदी, जयश्री चितळे, संजीवनी घेवडेकर, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, आशिष खातू, निशिकांत भोजने, रसिका देवळेकर तसेच राष्ट्रवादीच्या वर्षा जागुष्टे यांनी मतदान केले. या ठरावावेळी राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. या वेळी काँग्रेसच्या ५ व २ अपक्ष नगरसेवकांनी ठरावाविरोधी मतदान केले. परिणामी ९ विरुद्ध ७ असा ठराव मंजूर झाला.