चिपळूण पालिकेत भाजपच्या नगरसेविका सीमा रानडेंचे सीमोल्लंघन 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

अनेकवेळा विनंती करूनही रस्ते होऊ दिले जात नव्हते. वडनाक्‍यातील, सोनार आळीतील रस्ता हॉटमिक्‍समध्ये करून मिळावा, अशी मागणी होती. परंतु तो रस्ता जाणीवपूर्वक कोल्डमिक्‍समध्ये करण्यात आला. हे काम निकृष्ट होत असल्याने नागरिकांनी ते थांबवले. 

चिपळूण ( रत्नागिरी ) - विकासकामांसाठी भाजपला साथ दिली. मात्र प्रभागातील अपेक्षित कामे झालीच नाहीत. माझी कामे अडवून ठेवण्यात आली. या बाबी पक्षांतील वरिष्ठांच्या कानावर घातल्या, तरीही काही उपयोग झाला नाही. त्यामुळेच आपण भाजपला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा नगरसेविका सीमा रानडे यांनी केली. चिपळूण शहर भाजपला पालिकेत हा मोठा धक्का मनाला जात आहे. 

रानडे म्हणाल्या, अजूनही विकासकामे करण्यासाठी कितीही लढावे लागले तरी चालेल, पण लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला. त्याला मी तडा जाऊ देणार नाही. 2016 मध्ये पालिकेची निवडणूक झाली. तेव्हा मी भारतीय जनता पक्ष जिल्हा अध्यक्षांकडे तिकीट मागितले होते. पण ते नाकारण्यात आले. म्हणून मी अपक्ष निवडणूक लढले आणि निवडूनही आले. यापूर्वी 2011 मध्ये मी भाजपची महिला अध्यक्षा असूनही मला तिकीट दिले नव्हते. तेव्हाही मी 4 प्रभागातून चांगले मताधिक्‍य घेतले. पण विजयी होता आले नाही. निवडून आल्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष माझ्या घरी आले. त्यांनी मला पालिकेत भाजपला पाठिंबा देण्याची विनंती केली. प्रभागातील विकासकामे करूया असा शब्द दिला. पहिल्यापासून भाजपच्या विचाराची असल्याने मी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले. अनेक कामे सभापती असताना लेखी स्वरूपात दिली होती. त्याचा पाठपुरावाही करत होते, पण जाणूनबुजून माझी कामे होऊ दिली नाहीत. अनेकवेळा विनंती करूनही रस्ते होऊ दिले जात नव्हते. वडनाक्‍यातील, सोनार आळीतील रस्ता हॉटमिक्‍समध्ये करून मिळावा, अशी मागणी होती. परंतु तो रस्ता जाणीवपूर्वक कोल्डमिक्‍समध्ये करण्यात आला. हे काम निकृष्ट होत असल्याने नागरिकांनी ते थांबवले. 

2021 मध्ये चिपळूणमध्ये पुन्हा सर्वसाधारण महिला आरक्षण पडले तर नगराध्यक्ष पदासाठी मी स्पर्धेत येईन म्हणून माझे पंख छाटण्याचे प्रयत्न सातत्याने करण्यात आले. या सगळ्याला कंटाळून मी सभापतिपदाचा राजीनामा देत होते. सहकारी नगरसेवकांनी समजावल्याने मी थांबले. माझ्या प्रभागाची कामे होण्यासाठी भाजपलाच पाठिंबा दिला होता. पण माझा आणि प्रभागातील लोकांचाही भ्रमनिरास झाला. वर्षानुवर्षं ज्या पक्षाचे काम केले, त्याच पक्षात अनेकदा अन्याय सहन केला. पक्ष सोडताना दुःख होत असले तरी नाईलाज आहे. 
- सीमा रानडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Chiplun Municipality Corp orator Seema Ranade Leave BJP