
चिपळूण : मॉन्सूनच्या हुलकावणीने बळीराजाची झोप उडाली
चिपळूण : आठवडाभरापूर्वी दोन-तीन दिवसांत मॉन्सून सक्रिय होण्याचा हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला आहे. मॉन्सूनने हुलकावणी दिल्याने पेरणी केलेले भातबियाणे खराब होण्याच्या स्थितीत आहेत. ज्या ठिकाणी भाताची उगवण झाली आहे, ती पावसाअभावी उन्हाच्या तीव्रतने होरपळून निघत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
या वर्षी एप्रिल व मे च्या पहिल्या पंधरवड्यात अवकाळी पाऊस झाला. हवामानखात्याने या वर्षी मान्सून वेळेत सुरू होईल, असा अंदाज वर्तवला होता. शिवाय सहा किंवा सात जूनपर्यंत मान्सून सक्रिय होईल, असे सांगितले होते. त्या अगोदरच वातावरणात बदली झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भातपिकाची पेरणी सुरू केली. सोबत रासायनिक खतांची मात्राही गरजेनुसार दिली. पावसाच्या हलक्या सरींमुळे काही ठिकाणी भातपेरणी उगवली तर काही ठिकाणी पुरेसा ओलावा नसल्याने पीक उगवलेच नाहीच. त्यातच मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे उगवून आलेल्या भातबियांना मुंग्या व अन्य कीड लागल्याने ते खराब होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही..
पाण्याची सोय असलेले शेतकरी पीक जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. येत्या तीन-चार दिवसांत पावसाचे आगमन न झाल्यास पेरणी केलेली तसेच उगवून आलेली रोपे खराब होण्याचा धोका आहे. दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय असणार नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाचे आभाळाकडे डोळे लागून राहिले आहे.
Web Title: Chiplun Onset Monsoon Baliraja Fell Asleep Rsn
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..