esakal | महामार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण
sakal

बोलून बातमी शोधा

CHIPLUN

Chiplun : महामार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्याप्रश्नी आक्रमक झालेल्या येथील शिवसैनिकांनी शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी येथे जोरदार निदर्शने केली. खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत ठेकेदार कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या बेजबाबदारपणाचा तीव्र निषेध केला.

महामार्गावर शहरी हद्दीत व अन्य भागातही खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले आहे. जागोजागी खड्डे पडले असून गेल्या काही दिवसात किरकोळ व मोठ्या अपघाताचे प्रमाणे वाढले आहेत. या विषयी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नाही. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या सचिवांमार्फत ठेकेदार कंपनीला सूचना करण्यात आल्या होत्या. त्या पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयानेही या कामावर ताशेरे ओढले होते. १५ ऑक्टोबर पूर्वी महामार्गावरील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत; मात्र अजूनही संबंधित ठेकेदार कंपनीकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने शिवसैनिकानी जोरदार निदर्शने केली.

शहरातील अभिरुची हॉटेलसमोर सर्व शिवसैनिक एकवटले होते. खड्ड्यांवरून संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदार या विरोधात तीव्र निषेधाच्या घोषणा दिल्या. खड्ड्यात वृक्षारोपण करीत संताप व्यक्त केला. महामार्गावर सुमारे तासभर शिवसैनिकांनी आंदोलन केले. घटनास्थळी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. पोलिस उपअधीक्षक सचिन बारी यांनी घटनास्थळी हजेरी लावली होती. ठेकेदार कंपनी वारंवार सूचना करूनदेखील खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

या वेळी शहरप्रमुख उमेश सकपाळ, नगरसेवक शशिकांत मोदी, मनोज शिंदे, यतीन कानडे, निहार कोवळे, विकी लवेकर, उदय ओतारी, अंकुश नवले, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आठवड्यानंतर तीव्र आंदोलन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवण्याचा दिखावा करण्यात आला. भरलेले खड्डे चार दिवसही टिकत नाहीत. वारंवार खड्ड्यातून प्रवास करावा लागत असणारे वाहनचालक हैराण झाले आहेत. यामुळे आठवडाभरात खड्डेमुक्त महामार्ग न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

loading image
go to top