चिपळूण रेल्वे स्थानकावर अवतरले निसर्गसौंदर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

चिपळूण रेल्वे स्थानकावर अवतरले निसर्गसौंदर्य

चिपळूण : जिल्ह्याचे वैभव असलेले जंगल आणि वन्यप्राण्यांप्रती नागरिकांमध्ये प्रेम भावना निर्माण व्हावी, चिपळूणमध्ये रेल्वेमार्गाने येणाऱ्या पर्यटकांना येथील निसर्ग सौंदर्याची अनुभूती घ्यावी म्हणून वन विभागाने चिपळूण रेल्वे स्थानकावरील भिंती रंगवल्या आहेत. त्यामुळे चिपळूण रेल्वे स्थानकाच्या भिंती आता बोलक्या झाल्या आहेत. जणू रत्नागिरी जिल्ह्याचे निसर्गसौंदर्य या भिंतींवर अवतरले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जंगल आणि वन्यप्राणी वाचवण्यासाठी वन विभागाकडून वेगवेगळे प्रयोग राबविले जात आहेत. वन विभागाने मार्कंडी येथील कार्यालयाच्या भिंतींवर निसर्ग आणि वन्यप्राण्यांचे चित्र रेखाटले आहे. निसर्ग आणि वन्यप्राणी वाचवण्याचा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचावा यासाठी येथील विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांनी चिपळूण रेल्वे स्थानकाच्या भिंतींवर जिल्ह्याचे सौंदर्य रेखाटण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. उपविभागीय वनाधिकारी सचिन निलख, परिक्षेत्र वनाधिकारी राजेश्री कीर, मानव वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांनी त्याना सहकार्य केले. रेल्वे स्थानकावर चिपळूण शहरातील घारे पेंटर्स यांनी हे चित्र रेखाटले आहे.

चिपळूण रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर तिकीट खिडकीच्या परिसरात आल्यावर समोरच वाशिष्ठी नदीचे निसर्गरम्य परिसर नजरेस पडते.

गोवळकोटपासून नजर जाईल इतक्या लांब नदीचे चित्र भिंतीवर रेखाटण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकाच्या इतर भिंतीवर जिल्ह्यात आढळणारे पक्षी, प्राणी यांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. कोकणात आढळणारा राज्य पक्षी हरियाल, पंचरंगी सुर्यपक्षी, हरेवा, पांढऱ्या गालाचा कुरटूक, भारद्वाज, महाधनेश, राखी रानकोंबडा, रंगीत झुडपी दुर्लाब, हळदया, तिबोटी खंड्या, राज्य प्राणी शेकरू, बिबट्या, भेकर, गवा, साळींदर, पिसोरी, वानर, खवले मांजर यांच्यासह विविध फुलपाखरूंचे जनच्रकही येथे रेखाटण्यात आले आहे. जिल्ह्यातील वन विभागाच्या मालकीची जमिन किती आहे त्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात वणव्याची मोठी समस्या असते. वनवणवा थांबवा वन आणि वन्यजीव वाचवा अशा प्रकारचा संदेश देणारे चित्रही येथे रेखाटण्यात आले आहे.

चिपळूण स्थानकावर येणारे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना या भिंती आकर्षित करतील. नागरिकांच्या मनात जंगल आणि वन्यप्राणी वाचवण्याची भावना निर्माण होईल तर पर्यटकांना येथील निसर्ग पाहण्याची इच्छा जागृत होईल. यातून जंगल आणि प्राण्यांचे रक्षण होईल. पर्यटन वाढेल आणि त्यातून रोजगार वाढेल. लोकांमध्ये जनजागृती होईल. याच उद्देशाने या भिंती रंगविल्या आहेत.

- दीपक खाडे, विभागीय वनाधिकारी, चिपळूण

Web Title: Chiplun Railway Station Natural Beauty Landed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..