
चिपळूण : खेर्डी येथील सुमारे १४ कोटी खर्चाची सुधारित नळ पाणीपुरवठा योजना केवळ काहींच्या अहंमुळे पुरती गाळात रुतली आहे. योजनेबाबत फौजदारी स्वरूपाच्या तक्रारी झाल्याने त्यास ब्रेक लागला. परिणामी योजनेला पुन्हा बूस्टर मिळण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची जमीनमालकांची बैठक घेतली. या बैठकीत जमिनमालकांनी जागेच्या मोबदल्याची मागणी केल्याने तत्काळ तोडगा निघू शकला नाही. या प्रकरणी पुन्हा पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे.
खेर्डीची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नवीन सुधारित नळ पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. गेली १० वर्षे या योजनेचा गाजावाजा झाल्यानंतर प्रत्यक्षात ती मंजूर झाली होती. धुमधडाक्यात योजनेचे भूमिपूजन झाले. योजनेच्या साठवण टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी संबंधीत जमिनमालकांची संमती घेण्यात आली नाही. त्यामुळे यातील काही जमीनमालकांनी योजनेची अंमलबजावणी करणारे अधिकारी, तत्कालीन सरपंच व ठेकेदार विरोधात पोलिस ठाण्यात जमिनींची नासधूस केल्याप्रकरणी तक्रार केली होती.
त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षापासून योजनेचे काम ठप्प आहे. सुमारे १४ कोटी खर्चाची ही योजना आहे. डोंगरात उंचावर साठवण टाकी असल्याने अपार्टमेंटमध्ये थेट चौथ्या मजल्यावर योजनेचे पाणी पोहोचणार आहे. १४ कोटींपैकी सुमारे ५ कोटींचे काम झालेले आहे. मुख्यतः जलवाहिनींची कामे पूर्णत्वास गेली आहेत. साठवण टाकीकडे सुमारे ७५० मीटरचा रस्ता करावयाचा आहे. संबंधित जमिनमालकांची संमती गृहीत धरून सपाटीकरणाचे काम सुरू केले होते. त्यास जमीनदारांनी हरकती घेतल्या आहेत. या जागेचा मोबदला द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. याबाबत खेर्डी ग्रामपंचायतीत गुरुवारी (ता. ९) ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व जमीनदारांना बैठकीसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी निमंत्रित केले होते.
नेहमी वादग्रस्त होणारी बैठक शांततेत पार पडली. चर्चा सकारात्मक झाली तरी तोडगा मात्र निघालेला नाही. साठवण टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी संबंधित जमीनदारांना जागेचा मोबदला हवा आहे. सध्याच्या योजनेत मोबदला देण्यासाठी निधीची तरतूद नाही. रस्त्यासाठी संबंधितांनी मोफत बक्षीसपत्राने जागा घेण्याचे प्रस्तावित होते; मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. त्यावर चर्चा होण्यासाठी पुन्हा संयुक्त बैठक घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दोन गटांच्या राजकारणात योजना रखडली
खेर्डीतील पाणीयोजना केवळ राजकीय इर्ष्येच्या गर्तेत अडकल्याचे खेर्डीवासीय व पंचक्रोशीला ज्ञात आहे. येथील दोन गट एकमेकांना थेट पाण्यात बघतात. एकमेकांना नामोहरम करण्याची संधी सोडत नाहीत. केवळ नेत्यांनी इगो बाजूला ठेवला तरी योजना मार्गी लागण्यात मदत होणार आहे.