रत्नागिरीत पहिल्याच दिवशी शहरी बससेवेच्या 130 फेर्‍या

मकरंद पटवर्धन
Monday, 21 September 2020

फेर्‍यांना प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. उद्यापासून आणखी फेर्‍या वाढवण्यात येणार आहेत. 

रत्नागिरी : कोरोना महामारीतून रत्नागिरी हळुहळू अनलॉक होत असून आजपासून शहरी बससेवा सुरू झाली. पहिल्या दिवशी गावात जाऊन-येऊन अशा 130 फेर्‍या सोडण्यात आल्या. विविध गावांत एसटी सोडण्यात आली. सुमारे 1500  किमीवर एसटी धावली. या फेर्‍यांना प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. उद्यापासून आणखी फेर्‍या वाढवण्यात येणार आहेत. 

शहरी बससेवा सुरू करण्याचे आदेश 19 सप्टेंबरला प्राप्त झाल्यानुसार आजपासून ही सेवा सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी 26 चालक, वाहक व वाहतूक नियंत्रक, पर्यवेक्षक आदी कर्मचार्‍यांनी सेवा बजावली. शहरी एसटी बसस्थानकात सकाळपासून फेर्‍या सोडण्यास सुरवात झाली. स्थानकाची स्वच्छताही करण्यात येत होती. प्रवाशांना सॅनिटायझर, मास्कचा वापर करणे अत्यावश्यक आहे. यामुळे प्रवासी काळजी घेत आहेत की नाही, हे वाहक पाहत होते.

हेही वाचा -  कोकणात ऑनलाईन रिपोर्टमध्ये कृषीच्या १२ घटकांचा समावेश ; एका क्लिकवर मिळतोय ताळेबंद 

साधारण 22 मार्चनंतर शहरी बससेवा पूर्ण ठप्प झाली. त्यामुळे एसटीचे सर्व उत्पन्न बुडाले. कर्मचार्‍यांचे पगारही वेळेवर मिळत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली. सद्यस्थितीत दोन महिन्यांचे पगार झाले नसल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य शासनाने एसटी महामंडळ खबरदारी घेऊन पूर्ण क्षमतेने एसटी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. शहर परिसरात सुमारे 15 किलोमीटरच्या गावांमध्ये शहरी एसटी सेवा चालू आहे. शहरात नोकरी, व्यवसायानिमित्त येणार्‍यांना या एसटीचा खूपच उपयोग होतो. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने त्यावर अवलंबून व्यवसाय ठप्प आहेत. याचा परिणाम एसटीवरही होत आहे. 

प्रवाशांना दिलासा

शहरी एसटी बसस्थानकातून एसटी सुरू झाली, याचा फायदा प्रवाशांना जास्त आहे. कारण आसपासच्या गावांतून अनेक जण खासगी वाहन, रिक्षाने प्रवास करत होते. जिथे एसटीचे तिकीट 10 रुपये आहे, त्यासाठी खासगी वाहतूकदार 30 रुपये आकारणी करत होते. आता एसटी सुरू झाल्याने या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - फिशिंगला सरंग्याचा आधार ; ट्रॉलिंगच्या जाळ्यात पापलेट आणि म्हाकुळ

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: city bus service start for today in ratnagiri 130 round for passengers