esakal | RTPCR लॅब बंद; इंजेक्शन खरेदीची चौकशी करा : भाजप
sakal

बोलून बातमी शोधा

RTPCR लॅब बंद; इंजेक्शन खरेदीची चौकशी करा - भाजप

RTPCR लॅब बंद; इंजेक्शन खरेदीची चौकशी करा - भाजप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमण प्रसाराची शक्यता अधिक असताना जिल्ह्यातील आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये घट, आरटीपीसीआर लॅबचे कामकाज बंद हे विषय खूप गंभीर आहेत. त्यामुळे आरटीपीसीआर लॅब पूर्ण क्षमतेने व्हावी आणि मोठ्या प्रमाणावर खरेदी झालेल्या इंजेक्शन खरेदीचीही चौकशी व्हावी, अशी द. रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात अॅड. पटवर्धन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ई मेलद्वारे संपर्क साधला आहे. रत्नागिरीमध्ये गाजावाजा करत आरटीपीसीआर लॅब सुरू करण्यात आली. मात्र अलीकडे काही दिवस या लॅबमध्ये डाटा फीड करणारे कर्मचारी उपलब्ध नाहीत. चार कर्मचारी त्यांचे कामाचा मोबदला त्यांना न मिळाल्यामुळे काम करण्यास येत नाहीत. आरोग्य प्रशासनाकडे ती व्यवस्था हाताळू शकेल, असे अन्य कर्मचारी नसावेत. त्यामुळे सदर आरटीपीसीआर लॅबचे काम बंद आहे, असे समजते. आरटीपीसीआर स्वॅबचे रिपोर्ट अन्य जिल्ह्यातून तपासून घेतले जातात, अशी माहिती मिळत आहे.

स्वाभाविकपणे या चाचण्यांचे प्रमाण खूप घटले आहे, ही गोष्ट खूप गंभीर आहे. या लॅबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (कंत्राटी) मोबदला वेळीच देणे, ही जबाबदारी प्रशासनाची आहे. या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून आरटीपीसाआर लॅब तात्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी या अॅड. पटवर्धन यांनी केली आहे.

महागड्या इंजेक्शनवर कोट्यवधीचा खर्च?

जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटर्स रुग्ण नसल्याचे कारण देऊन बंद केली आहेत. काम करणाऱ्या परिचारिकांना ठरलेला मोबदला दिला गेला नाही अशी माहिती मिळत आहे. तसेच काही महागडी इंजेक्शन गरज नसतानाही मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाला आहे, हाही विषय गंभीर असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी म्हटले आहे. त्यामुळे इंजेक्शन खरेदी इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली असल्यास ती कशी झाली? याबाबतही चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

बातमीदार- मकरंद पटवर्धन...

loading image
go to top