ढगाळ वातावरणाचा हापूसला फटका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

चिपळूण - वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतदार चिंतातूर झाला आहे. गुरूवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. पावसाची शक्‍यता असल्यामुळे आंबा पिकावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

चिपळूण - वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतदार चिंतातूर झाला आहे. गुरूवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. पावसाची शक्‍यता असल्यामुळे आंबा पिकावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

सध्या आंबा पिकावर मोठया प्रमाणात तुडतुड्यांचा प्रादूर्भाव झाला असून यासाठी फवारणी केली जात आहे. सुरुवातीला आंबा मोठ्या प्रमाणात येईल अशाप्रकारे मोहोर आला होता. चांगले वातावरण निर्माण झाले असतानाच थंडीची लाट आल्याने मोहोर गळणे व नंतरच्या कडक उन्हाने मोहोर करपण्याची क्रिया सुरू झाली. त्यात आंब्याची तयार कणी गळण्याचे प्रमाण वाढले. 

गुरूवारी सकाळपासूनच चिपळूणात वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण असून पावसाची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. वाऱ्याचा वेगही वाढला असून यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत. पाऊस पडल्यास तयार पीक गळून जाणार आहे. दुबार मोहोरामुळे बागायती धोक्‍यात आल्या. आता पावसाची शक्‍यता असल्यामुळे मोठे संकट ओढवणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

बागायतीमध्ये मोठ्याप्रणात तुडतुड्याचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बागायतदार विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. त्यातच वानरांचाही मोठयाप्रमाणात उपद्रव वाढला असून त्यांच्या बंदोबस्तासाठीही दिवसभर बागायतीमध्ये शेतकऱ्यांना वास्तव्य करावे लागत आहेत. 

मोठ्या कैरीवर वातावरणाचा कोणताही परिणाम होणार नाही. बुरशीजन्य रोगापासून आंब्याला वाचवण्यासाठी वेळेत फवारणी होणे गरजेचे आहे. बागायतदारांनी कृषी विभागाचा सल्ला घेवून फवारणी करावी. 

- मनोज गांधी, कृषी पर्यवेक्षक चिपळूण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cloudy weather hurts Hapus season