रत्नागिरी जिल्हा बॅंकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व : दोन संचालकांना पराभवाचा धक्का ; Ratnagiri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri

रत्नागिरी जिल्हा बॅंकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व : 19 जागांवर विजय

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलला पाच जागांवर विजय मिळविता आला. मात्र, विद्यमान दोन संचालकांना पराभवाचा धक्का बसला. तरीही बिनविरोध १४ जागांसह २१ पैकी १९ जागा सर्वपक्षीय सहकार पॅनेलला ताब्यात ठेवण्यात यश आले. यामुळे बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व अबाधित राहिले. सहकार पॅनेलविरोधात दंड थोपटणारे लांजाचे अजित यशवंतराव (Ajit Yashwantrao) दुग्धोत्पादन मतदारसंघातून, तर भाजपचे लांजा तालुकाध्यक्ष महेश ऊर्फ मुन्ना खामकर (Munna Khamkar) हे विजयी झाले.

येथील नगर वाचनालयात जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सोपान शिंदे, निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. दोन तासांत निकाल जाहीर झाला. जिल्हास्तरीय विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश मारुती कांबळे यांनी ६९२ मते घेत सचिन चंद्रकांत बाईत यांचा पराभव केला. बाईतांना १६४ मते मिळाली. मजूर संस्था मतदारसंघातून सहकारचे दिनकर गणपत मोहिते ४८ मते घेत विजयी झाले. त्यांच्या विरोधातील राकेश श्रीपत जाधव यांना ४५ मते मिळाली. मोहिते अवघ्या तीन मतांनी विजयी झाले. नागरी पतसंस्था मतदारसंघासाठी सहकारच्या संजय राजाराम रेडीज यांना अ‍ॅड. सुजित झिमण यांनी चांगलेच झुंजविले. रेडीज यांना ६६, तर झिमण यांना ५६ मते मिळाली. अवघ्या १० मतांनी रेडीज निवडून आले.

हेही वाचा: जात पडताळणीसाठी दोन्ही पर्याय उपलब्ध; 'या' तारखेपर्यत करा अर्ज

सर्वांची उत्सुकता लागलेल्या दुग्धसंस्था मतदारसंघातून सहकारचे विद्यमान संचालक गणेश यशवंत लाखण यांचा अजित यशवंतराव यांनी पराभव केला. लाखणना १० मते, तर यशवंतराव यांना २५ मते मिळाली. रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सहकारचे गजानन पाटील यांना ३३, तर प्रल्हाद महादेव शेट्ये यांना आठ मते मिळाली.

लांजा तालुका मतदारसंघातील निकाल धक्कादायक ठरला. सहकारचे आदेश दत्तात्रय आंबोळकर यांना भाजपचे तालुकाध्यक्ष महेश रवींद्र खामकर यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. आंबोळकर यांना १६, तर विजयी श्री. खामकर यांना १८ मते मिळाली. माजी संचालक सुरेश विष्णू ऊर्फ भाई साळुंखे यांच्या प्रयत्नामुळे निवडून आल्याचे खामकर यांनी सांगितले. गुहागर तालुका मतदारसंघातून सहकारच्या अनिल विठ्ठल जोशी यांना १३, तर चंद्रकांत धोंडू बाईत यांना आठ मते मिळाली. जोशी पाच मतांनी निवडून आले. बँकेचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत बाईत, त्यांचे सुपुत्र तथा शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत या दोघांना पराभव पत्करावा लागला.

सहकारला १९ जागा

सहकार पॅनेलच्या १४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यात आणखी पाच जागांची भर पडल्याने १९ जागा मिळाल्या आहेत. त्यात डॉ. तानाजीराव चोरगे, बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम, सुधीर कालेकर, जयवंत जालगावकर, रमेश दळवी, अ‍ॅड. दीपक पटवर्धन, महादेव सप्रे, मधुकर टिळेकर, अमजद बोरकर, राजेंद्र सुर्वे, रामचंद्र गराटे, नेहा माने, दिशा दाभोळकर यांचा समावेश आहे.

प्रत्येक मतदाराने विश्‍वास दिल्यानेच या निवडणुकीत यश मिळविता आले. या मतदारसंघात नव्याने काम करताना सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे.

- अजित यशवंतराव, विजयी उमेदवार

जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे सर्व संचालक एकत्र येऊन बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने हाकण्यासाठी सज्ज आहेत.

- डॉ. तानाजीराव चोरगे, अध्यक्ष

loading image
go to top