रिफायनरीचे समर्थन : आमदार जाधवाबाबत खासदार राऊत काय म्हणणार?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

 

रिफायनरीचे समर्थन ; यापूर्वी घेतली होती कडक भूमिका

राजापूर (रत्नागिरी) :  ज्या शिवसैनिकांच्या बळावर विनायक राऊत खासदार झाले त्या शिवसैनिकांनी कोकण विकासासाठी रिफायनरी प्रकल्पाची मागणी केली असता राऊत यांनी त्यांना चपलेने झोडण्याचे आदेश दिले.  आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करून विकासाचा बाजूने कौल दिलेला असताना आता राऊत कोणती भूमिका घेणार, असा सवाल कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी उपस्थित केला आहे.

 लॉकडाऊनच्याकाळात आमदार जाधव यांचा रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणार्‍या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमुळे पुन्हा एकदा तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प चर्चेत आला आहे. कोकणातील वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि कोकण विकासासाठी प्रदूषण विरहीत प्रकल्प कोकणात यावेत आणि सर्वांनी अशा प्रकल्पांचे स्वागत केले पाहिजे, असे आमदार जाधव यांनी वक्तव्य केले आहे.

हेही वाचा- प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत : व्हिडीओ व्हायरल , रिफायनरी समर्थकाना आमदार जाधवांचे बळ... -

त्यांनी कोकण विकासासाठी प्रकल्पांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करताना रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले आहे. त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला रिफायनरी प्रकल्प समर्थन आणि विरोध यावरून तालुक्यातील शिवसेनेतर्गंत वाद उफाळून आला होता. सेनेचा या प्रकल्पाला विरोध असताना सागवे विभागातील सेनेच्या पदाधिकार्‍यांनी कोकण विकासासाठी रिफायनरी हवी असल्याची भूमिका घेतली होती. त्याचे सेना संघटनेमध्ये पडसाद उमटताना रिफायनरीचे समर्थन करणार्‍या सागवे विभागातील पदाधिकार्‍यांसह विभागप्रमुख राजा काजवे, जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकर यांची पक्षातून हकालपट्टीची घोषणा सागवे येथील सेनेच्या मेळाव्यामध्ये राऊत यांनी केली होती.

हेही वाचा- गोव्यास कामास असणाऱ्या रेडीतील तरूणीची आत्महत्या -

रिफायनरीचे समर्थन करणार्‍या शिवसैनिकांना चप्पलेने मारा असे वक्तव्यही केले होते. असे असताना सेनेचे आमदार जाधव यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेऊन विकासाचा बाजूने कौल दिला आहे. आता सर्वसामान्य शिवसैनिकांना चपलेने झोडण्याची भाषा करणारे खासदार राऊत यावर काय भूमिका घेणार? असा सवाल कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने उपस्थित केला आहे. रिफायनरी समर्थनाची भूमिका घेणार्‍या प्रत्येक शिवसैनिकावर कारवाई करून स्वतःच्या हाताने शिवसेना संपविणार का, असा सवालही आंबेरकर यांनी उपस्थित केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: comment in refinery project in ratnagiri