esakal | '350 कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले पण आम्ही सुरक्षित आहोत'

बोलून बातमी शोधा

'350 कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले पण आम्ही सुरक्षित आहोत'
'350 कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले पण आम्ही सुरक्षित आहोत'
sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती अतिशय भयानक आणि वेदनादायी आहे. चर्मालय स्मशानभूमीत आम्ही पाच-पाच असे दहा कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करीत आहोत. मृत्यूचे प्रमाण एवढे वाढले आहे की, दिवसाला आम्ही दहा ते पंधराजणांवर अंत्यसंस्कार करतो. सर्व खबरदारी घेतो. वर्षभरात 350 कोरोनाबाधित मृतदेहांना अग्नी दिला. परंतु अजून आमच्यापैकी कोणीही बाधित नाही, ही देवाची कृपाच म्हणावी लागेल, असे हृदयाला हात घालणारे उद्‌गार जितेंद्र विचारे आणि सहकाऱ्यांनी काढले.

शहरातील चर्मालय स्मशानभूमीतील ही परिस्थिती थरकाप उडवणारीच आहे. गेल्या चार दिवसांत कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढल्याने एक क्षणही विसावा न घेता पालिकेचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. पीपीई कीटने वाढणारा गरमीचा त्रास, दिवसभर सुरू असलेले काम, अग्नीचा दाह, याची वाच्यताही ते करत नाहीत. याबाबत पालिकेचे जितेंद्र विचारे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, पहिल्या लाटेत नातेवाईकसुद्धा अंत्यसंस्कारासाठी येत नव्हते. बेवारसाप्रमाणे आम्ही बाधितांचे दहन करत होतो. हे सर्व अतिशय वेदना देणारे होते. दुसऱ्या लाटेत लोकांची भीती कमी झाली आहे; मात्र मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

मृतांचे नातेवाईक अखेरचे दर्शन किंवा अग्नी देण्यासाठी येत आहेत. आम्ही माणुसकी दाखवून त्यांना पीपीई कीट देतो. एक मोठा बांबू ठेवला आहे. त्याला कापड बांधून नातेवाइकाकडून अग्नी देण्याचा प्रयत्न करतो. तेवढेच त्यांना मानसिक समाधान. मात्र, मृतदेह पाहून साऱ्यांचेच मन आपोआप भरून येते. पहिल्या लाटेत कोरोनाने मृत्यू झालेल्यांना नातेवाइकांचा खांदा आणि अग्नीही मिळाला नाही. दुसऱ्या लाटेत कोरोनाची भीती कमी झाली. मात्र, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोविडसाठी राखीव चर्मालय स्मशानभूमीवर ताण आहे. पालिकेच्या दहा कर्मचाऱ्यानी दिवसरात्र जीव धोक्‍यात घालून वर्षांमध्ये 350 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.

...हे आहेत पालिकेचे कोरोना योद्धा

पालिकेचे टीमप्रमुख जितेंद्र विचारे, ज्ञानेश कदम, जोगेंद्र जाधव, प्रभाकर कांबळे, बबन बेटकर, संकेत कांबळे, रोहित आठवले, नितीन राठोड, संतोष राठोड, नरेश राठोड, सुनील माटल, हरीश जाधव अशी त्या कोरोना योद्‌ध्यांची नावे आहेत.

  • सहा स्टॅण्ड आणि एक गॅसदाहिनी

  • दिवसरात्र 17 जणांवर अंत्यविधी

  • 10 कर्मचारी दिवसरात्र कर्तव्याला

  • सुरक्षेसाठी सर्व खबरदारी