पॉझिटीव्ह रूग्णावरून सावंतवाडी तालुक्‍यात गोंधळ

शिवप्रसाद देसाई
Sunday, 26 July 2020

सावंतवाडी : येथील तालुक्‍यात नव्याने तीन रुग्ण सापडल्याने भीती निर्माण झाली आहे. तालुक्‍याची आता कोरोना रुग्णांची संख्या 50 वर पोचली आहे.

सावंतवाडी : येथील तालुक्‍यात नव्याने तीन रुग्ण सापडल्याने भीती निर्माण झाली आहे. तालुक्‍याची आता कोरोना रुग्णांची संख्या 50 वर पोचली आहे. हे रुग्ण कारिवडे, नेतर्डे आणि तिरोडा येथील आहेत. यातील नेतर्डेतील व्यक्तीने आपला पत्ता सावंतवाडी सबनीसवाडा दिल्याने शहरात खळबळ उडाली; मात्र संबंधित व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

येथील तालुक्‍यात रुग्णाचा आलेख वाढतच असून आता अर्धे शतकही पूर्ण झाले आहे. बांदा, चितारआळी आणि तळवडे येथे रुग्ण सापडल्यानंतर आता कोरोनाचा फैलाव वाढत असून आणखीन तीन गावांमध्ये हे रुग्ण सापडले आहेत. यातील कारिवडे, तिरोडा आणि नेतर्डे याठिकाणचे रुग्ण आहेत. त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे या रुग्णांपासून संपर्क होण्याची धोक्‍याची शक्‍यता कमी आहे. 

नेतर्डे येथील रुग्ण हा मुंबई येथून सावंतवाडीत आला होता. सावंतवाडी सबनीसवाडा येथे त्याचा फ्लॅट असून त्याला येथील सैनिक वसतीगृहात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. 22 जुलैला त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. आज सकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला; मात्र त्याने आपला पत्ता सावंतवाडी सबनीसवाडा दिल्याने सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा घबराट पसरली. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांना विचारले असता संबंधित व्यक्ती मूळ नेतर्डेतील असल्याचे सांगितले. 

चितारआळी येथील सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध अद्यापही सुरू आहे. आतापर्यंत 25 जण अतीजोखमीच्या संपर्कातील असल्याची नोंद झाली आहे. प्रशासनाने आवाहन केल्यानुसार कमी जोखमीच्या संपर्कातील स्वॅब टेस्टसाठी नागरिक पुढे येत आहेत. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे. गेले काही दिवस रुग्ण संख्या वाढत असून तालुक्‍यात आता पन्नासचा आकडा आहे. 

चितारआळी परिसरात कोरोना पॉझिटीव्ह झालेल्या त्या दाम्पत्याच्या कुटुंबियांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. हे दाम्पत्य पॉझिटीव्ह मिळाल्यानंतर त्यांच्या कुंटुबियांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात त्या दांपत्याच्या दोन्ही मुलांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून आई-वडीलांचेही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कुटुंबियांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्या दोन्ही मुलांना सावंतवाडीत घरी पाठवणार असून राहत्या घरात होम क्वारंटाईन केले जाणार आहे. 

दाम्पत्य पॉझिटिव्ह, कुटुंब सदस्य निगेटिव्ह... 
चितारआळी भागातील एक दांपत्य काही दिवसांपूर्वी मुंबई येथे प्रवास करून आले होते. त्यानंतर त्यातील महिलेला ताप येत असल्याने त्यांनी आपले स्वॅब तपासून घेतले होते. त्यावेळी त्या दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता; मात्र हे दाम्पत्य आपल्या घरात कुटुंबीयांसह राहत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांचे आई, वडील व मुले यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

"त्या' संदेशाचे खंडन... 
सावंतवाडीमध्ये कोरोना रूग्ण आढळला की नाही याबाबत येथील शहरातील आरोग्य यंत्रणेकडे कोणतीच माहीती नव्हती. पालिकेचे नोडल ऑफीसर व उपजिल्हा रूग्णालयातील यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवित होते; मात्र कोरोना संदर्भातील माहिती कोणाकडे उपलब्ध नसल्याने यंत्रणा सुशेगाद असल्याचे दिसून आले. सावंतवाडी शहरासंदर्भातील आलेला कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा नवे अहवाल आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगत सोशल मीडियावरील "त्या' संदेशाचे खंडन केले. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion in Sawantwadi taluka from positive patient