
पावस गटाच्या गावखडी, पावस, नाखरे, शिवारआंबेरे व डोर्ले - दाभिळआंबेरे ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. त्यात पावस ग्रामपंचायतीच्या तेरापैकी 12 जागा सेना पॅनेलने, तर एक जागा भाजपने जिंकली आहे.
पावस ( रत्नागिरी ) - पावस जिल्हा परिषद गटातील पाच ग्रामपंचायत निवडणुकीत तीन ग्रामपंचायती शिवसेनाप्रणित पॅनेलने ताब्यात घेतल्या असून दोन ग्रामपंचायतीमध्ये त्यांना भोपळाही फोडता आला नाही. चाळीस वर्षे भाजपाप्रणित पॅनेलच्या ताब्यात असलेली डोर्ले - दाभिळआंबेरेवर बहुजन विकास आघाडीने बहुमत प्राप्त केले. या गटात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अस्तित्व कुठेही दिसून आलेले नाही.
पावस गटाच्या गावखडी, पावस, नाखरे, शिवारआंबेरे व डोर्ले - दाभिळआंबेरे ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. त्यात पावस ग्रामपंचायतीच्या तेरापैकी 12 जागा सेना पॅनेलने, तर एक जागा भाजपने जिंकली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात स्वबळावर प्रथमच एक जागा जिंकून पक्षाची मुहूर्तमेढ रोवली आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत सेनेचे बहुमत असूनही गावपॅनेलने सत्ता काबीज केली होती. या खेपेस शिवसेना - राष्ट्रवादी व गाव पॅनेल एकत्र आल्यामुळे त्यांनी निर्विवाद यश संपादन केले. भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
नाखरे ग्रामपंचायतीवर चौथ्यांदा विजय प्राप्त करून माजी सरपंच विजय चव्हाण यांनी दबदबा निर्माण केला आहे. सन 2015 मध्ये गावखडी ग्रामपंचायतीवर गाव पॅनेलने सत्ता संपादन करून शिवसेना पॅनेलला सत्तेपासून दूर ठेवले होते. या खेपेस सेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी वाद बाजूला ठेवून निवडणूक लढवल्यामुळे अकरापैकी आठ जागांवर विजय प्राप्त केला.
भाजपप्रणित पॅनेलला तीनच जागा मिळाल्या. शिवारआंबेरे येथे पंधरा वर्षे एकहाती सत्ता प्राप्त करणारे शिवसेनेचे शिरसेकर यांना बाजूला ठेवून सत्तेवरून खाली खेचले. शिरसेकर व त्यांची पत्नी हे दोघेच निवडून आले. उर्वरित पाच जागांवर बहुजन विकास आघाडीचे पाच सदस्य निवडून आल्याने बहुजन विकास आघाडीचा सरपंच बसणार हे निश्चित झाले आहे. डोर्ले-दाभिळआंबेरे ग्रामपंचायतीवर 40 वर्षे भाजपची सत्ता होती. या वेळी मात्र सातपैकी बहुजन विकास आघाडीला चार, तर भाजपप्रणित आघाडीला तीन जागा मिळाल्या.
आता लक्ष सरपंच आरक्षणाकडे
गटातील पाच ग्रामपंचायतींपैकी सेना पॅनेलकडे तीन ग्रामपंचायती, तर दोन ग्रामपंचायती बहुजन विकास आघाडीकडे आहेत. आता लक्ष सरपंच आरक्षणाकडे आहे. सध्या या गटातून शिवसेनेचे 31, भाजपचे सात, बहुजन विकास आघाडीचे 9 सदस्य निवडून आले आहेत. या पाच ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, भाजपा व बहुजन विकास आघाडी समोरासमोर निवडणूक लढले होते. यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस कुठेही नव्हते.