काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणाले, गीतेंना मतदान करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

खेड - आघाडीच्या नुकत्याच झालेल्या दस्तुरी येथील सभेत काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी व्यासपीठावरून शिवसेना व भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांनाच मतदान करा, असे आवाहन केल्याने सर्वंचजण अवाक्‌ झाले.

खेड - आघाडीच्या नुकत्याच झालेल्या दस्तुरी येथील सभेत काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी व्यासपीठावरून शिवसेना व भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांनाच मतदान करा, असे आवाहन केल्याने सर्वंचजण अवाक्‌ झाले. मात्र, ही चुकून झालेली गोष्ट आहे. त्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच भांडवल करून काँग्रेसच्या या मल्टीपल तालुकाध्यक्षांना चांगलेच अडचणीत आणले. 

नुकतीच राष्ट्रवादीचे रायगड लोकसभेचे उमेदवार तटकरे यांच्या प्रचारार्थ खेड - दस्तुरी येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या दरम्यान मतदारसंघातील सर्वंच आघाडीचे घटक असलेल्या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर होते.

यावेळी तालुकाध्यक्ष गौस खतिब म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत आपण मतदान करणे आवश्‍यक आहे. मतदानासाठी सुट्टी आहे. मतदान करा आणि मग कुठेही जा. मेहरबानी करून आपले एक एक मत महत्त्वाचे आहे. तरी २३ तारखेला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत गीते साहेबांना मत द्यायचे आहे. जय हिंद जय भारत, असे म्हणत त्यांनी भाषण संपवले. तोपर्यंत गोंधळ झालाच होता. ही चूक व्यासपीठावरील मान्यवरांनी खतिब यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी तत्काळ माफी मागत आपल्याला तटकरे साहेबांना निवडून द्यायचे आहे, तरी आपण त्यांना मतदान करूया, असे सांगितले. परंतु, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याचा फायदा घेत तत्काळ हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे तालुकाध्यक्ष अडचणीत आले.  

सर्वच पक्षांशी सोयरीक
ऐन निवडणुकीच्या काळात सर्वच पक्षांशी सोयरीक जुळवणारा तालुकाध्यक्ष अशी त्यांची ख्याती आहे. पालिका निवडणुकीत मनसेसोबत, तर जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत, कधी कोकणात तत्कालीन काँग्रेसच्या गटाबरोबर, तर कधी खासदार दलवाई गटाबरोबर. त्यामुळेच अशी चूक झाली असल्याची चर्चा सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Taluka President said, vote for Gite