सिंधुदुर्गातील विधानसभेच्या तिन्ही जागा कॉंग्रेस लढवणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

सिंधुदुर्गनगरी - लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही जागा कॉंग्रेस पक्ष पूर्ण ताकतीनिशी लढविण्याचा निर्णय आजच्या कॉंग्रेस जिल्हा कार्यकारीणी बैठकीत घेण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेश निरीक्षक राजन भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

सिंधुदुर्गनगरी - लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही जागा कॉंग्रेस पक्ष पूर्ण ताकतीनिशी लढविण्याचा निर्णय आजच्या कॉंग्रेस जिल्हा कार्यकारीणी बैठकीत घेण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेश निरीक्षक राजन भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

कॉंग्रेस पक्षाच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेश निरीक्षक भोसले, माजी आमदार सुभाष चव्हाण जिल्हा दौऱ्यावर असून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची चर्चा करुन जिल्ह्यातील तीन जागापैकी किती लढवायच्या याबाबत चाचपणी करण्यात आली. आज पार पडलेल्या कॉंग्रेस कार्यकारीणी बैठकीत येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील तिन्ही जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार पक्षाचे सिंधुदुर्ग प्रभारी सुभाष चव्हाण, नविनचंद्र बांदीवडेकर, सर्फराज नाईक, रामनाथ टोमके, काका कुडाळकर, जिल्हाध्यक्ष विकास सावंत उपस्थित होते. 

श्री भोसले म्हणाले, ""लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाला कमी मतदान झाले. कॉंग्रेसच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यामुळे लोकसभेच्या निवडणूकीत स्वाभिमानला कॉंग्रेसची मते मिळाली असा आमचा दावा आहे. स्वाभिमान पक्ष हा कॉंग्रेसचा घटक असल्याचा समज मतदारांचा झाल्याने ही चूक त्यांच्याकडून झाली; मात्र तशी चूक आता परत होणार नाही. मागील चुका सुधारून आता नव्या दमाने विधानसभेच्या निवडणूकीला सामोरे जाणार आहोत. राष्ट्रवादीसह सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन जिल्ह्यातील तिन्ही जागा कॉंग्रेस पक्षाकडून लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीसह मित्रपक्षांना कोणत्या जागा सोडाव्यात हा निर्णय वरीष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहे.'' 

आगामी विधानसभा निवडणूकीचे रणसिंग कॉंग्रेसने फूंकले आहे. प्रत्येक तालुक्‍यात प्रभारीची नेमणूक करून प्रत्येक मतदारांपर्यंत कॉंग्रेसचे विचार पोहोचविले जातील. इच्छूक उमेदवारांनी द्यावी हा निर्णय कॉंग्रेसची वरीष्ट कमिटी घेणार आहे. तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्यांने निवडणूकीसाठी सज्ज रहा असा संदेश देण्यात आला आहे. 

आमदार राणे कॉंग्रेसमध्ये नाहीत 
आमदार नितेश राणे हे जरी कॉंग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले असले तरी त्यांचे कार्य कॉंग्रेस विरोधी आहे. त्यामुळे त्यांना कॉंग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जात नाही. त्यामुळे ते सध्या कॉंग्रेसमध्ये नाहीतच; मात्र त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला नाही. कारण काढून टाकून त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही. कॉंग्रेसचे आमदार असूनही नितेश राणे कॉंग्रेसला मानत नाहीत आणि भाजपचे खासदार असून नारायण राणे भाजपला मानत नाहीत. त्यांना काय महत्त्व द्यावे? अशी टीका यावेळी भोसले यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress will fight all the three seats in Sindhudurg assembly