कोकणगीड्ड गोवंशाचे चिपळूणच्या प्रगती गोशाळेत संवर्धन

प्रकाश जोशी
बुधवार, 13 मार्च 2019

‘‘गायीच्या देखभालीसाठी बराच खर्च लागतो. हा खर्च भरून काढण्यासाठी गोमूत्र व पंचगव्यापासून उत्पादनांची निर्मिती केली. त्यातून रोजगार निर्मिती देखील झाली.’’
- अनिकेत बापट, चिपळूण.

चिपळूण - कोकणातील दुर्मिळ होत चाललेल्या कोकणगीड्ड या गोवंशाचे जतन कोकणगीड्ड प्रगती गोशाळेत केले आहे. या गोशाळेत गोमूत्र व पंचगव्याच्या संशोधनाच्या आधारावर ८० उत्पादनांची निर्मितीही केली आहे. येथील युवा संशोधक अनिकेत बापट यांचा प्रकल्प आहे.

चिपळूणचे रहिवासी अनिकेत बापट यांनी  २०१६ च्या सुमारास भारत सेवक समाज या संस्थेमार्फत पंचगव्य निर्मितीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी खासगी गोशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोकणात सर्वत्र सापडणाऱ्या कोकणगीड्ड या गोवंशाचे संवर्धन गोशाळेत करण्याचे ठरवले. १५ गाई खरेदी केल्या. या गायींना बंदिस्त गोठा उपयोगी ठरत नाही. त्यामुळे बापट यांनी हरित डोंगर भाड्याने घेऊन मुक्त गोठा पद्धतीने या गोवंशाचे संवर्धन केले. 

गाईचे अर्थकारण हे दुधाच्या उत्पादनावर अवलंबून नव्हे, तर त्यावर आधारित उत्पादन निर्मिती व विक्रीमधून होते, हे आर्थिक सूत्र त्यांनी लक्षात घेतले. गोमूत्र व पंचगव्याच्या आधारे त्यांनी स्वतः एकूण २० उत्पादनाची निर्मिती सुरवातीला केली. नंतर हा उत्पादनाचा आकडा ८० पर्यंत पोहोचला. 

या उत्पादनाच्या निर्मितीतून गाईच्या संगोपनाचा खर्च निघतो. रोजगारनिर्मिती देखील होते. अनेक स्थानिक लोकांना रोजगारदेखील मिळतो. अर्थकारण साधल्याने गोवंश संवर्धन व रोजगार निर्मितीही या गोशाळेत होते. 

‘‘गायीच्या देखभालीसाठी बराच खर्च लागतो. हा खर्च भरून काढण्यासाठी गोमूत्र व पंचगव्यापासून उत्पादनांची निर्मिती केली. त्यातून रोजगार निर्मिती देखील झाली.’’
- अनिकेत बापट, चिपळूण.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conservation of KonkanGid domestic cow