सावधान ! जामसंडेत 13 घरांसाठी कंटेन्मेंट झोन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

सुरक्षितता म्हणून पॉझिटिव्ह सापडलेल्या रूग्णाच्या घराच्या सुमारे 50 मीटर परिसराचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला. यामध्ये 13 घरांसह 51 लोकवस्तीचा समावेश आहे.

देवगड ( सिंधुदुर्ग ) - येथील देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जामसंडे तरवाडी येथे कोरोना पॉझिटिव्हचे तीन रुग्ण आढळले. त्यामुळे स्थानिक यंत्रणा सतर्क झाली आहे. संबधित तिघेही शुक्रवारी (ता. 31) मुंबईहून आले होते. स्वॅब तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. सुरक्षितता म्हणून 13 घरांसाठीचा परिसर आज कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी दिली. 

येथील शहरात आता कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसत आहे. नगरपंचायत कार्यक्षेत्रात प्रथमच कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांना मुंबईची पार्श्‍वभूमी असली तरीही आता शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सावधानता बाळगणे आवश्‍यक बनले आहे. संबधित एकाच कुटुंबातील तीघेजण शुक्रवारी एका खासगी टॅव्हल्सने तरवाडी येथे आले होते. त्यांना होम क्‍वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या आरोग्य तपासणीवेळी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. स्वाब पॉझिटिव्ह आल्याने स्थानिक यंत्रणा सतर्क झाली. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा आता शोध सुरू झाला आहे. तरवाडी परिसरात नगराध्यक्षा प्रणाली माने, स्थानिक नगरसेवक संजय तारकर, नगरपंचायत मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. कोंडके यांनी भेट दिली.

सुरक्षितता म्हणून पॉझिटिव्ह सापडलेल्या रूग्णाच्या घराच्या सुमारे 50 मीटर परिसराचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला. यामध्ये 13 घरांसह 51 लोकवस्तीचा समावेश आहे. तसेच पॉझिटिव्ह सापडलेल्या तीघांनाही येथील शहरातील क्‍वॉरंटाईन केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. तसेच त्यांनी ज्या खासगी ट्रॅव्हल्स्‌मधून प्रवास केला होता. त्याच्या चालक, क्‍लिनरला क्‍वॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच अन्य प्रवाशांशी आरोग्य यंत्रणेमार्फत संपर्क झाला असून पुढील आवश्‍यक कार्यवाही सुरू असल्याचे श्री. गव्हाणे यांनी सांगितले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Containment Zone For 13 Houses In Jamsande Sindhudurg Marathi News