चितारआळीत व्यापाऱ्यांची कोंडी, काय आहेत मागण्या? वाचा... 

containment zone issue chitarali konkan sindhudurg
containment zone issue chitarali konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील चितारआळी भाग हा कंटेनमेंट झोन आहे. याठिकाणी असलेल्या होलसेल व्यापाऱ्यांना चतुर्थी सणाच्या तोंडावर त्यांचा माल बाजारात नेता येत नाही. त्यांची समस्या लक्षात घेऊन काही कालावधीसाठी त्यांना व्यवसायास जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी शहर हितवर्धक मंचाच्यावतीने केली आहे. 100 मीटरपेक्षा जास्त भागात असलेले कंटेनमेंट झोन कमी करावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

याबाबतचे निवेदन सुरेश भोगटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना दिले. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी खांडेकर यांची भेट घेत चर्चा केली. आपली बाजू मांडताना ते म्हणाले, की चितारआळी परिसर हा कोरोनामुळे कंटेनमेंट झोन असल्याने सर्वच बाजूनी बंद झाला आहे. त्यामुळे त्याचा तोटा येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. अनेक व्यापारी आपल्या व्यवसायापासून वंचित आहेत.

गणेश चतुर्थी, बकरी ईद हे सण तोंडावर आहेत. चितारआळी परिसरात मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग आहे. या परिसरात कापड व्यापार, लाकडी, पाठ, खेळणी, इलेक्‍ट्रिशियन, सोनार व इतर होलसेल व किरकोळ विक्रेते मोठ्या अडचणीत आहेत. तसेच कर्जबाजारी होऊन बसले आहेत. अशावेळी त्यांना आपल्या व्यवसायाकडे जाता येत नसून मोठे संकट उभे राहिले आहे. चतुर्थी सणाच्या एक महिना अगोदर व्यापाराचे नियोजन करण्यात येते.

माल नेणे-आणणे, किरकोळ व्यापाऱ्यांना घरपोच करणे अशा तऱ्हेची कामे महत्त्वाची असतात; मात्र कंटेनमेंट झोनमुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसानही झाले आहे. कंटेनमेंट झोनचे अंतर कमी करावे अथवा येथील व्यापाऱ्यांना निदान एक ते दीड तासासाठी माल बाहेर घेण्यास मुभा मिळावी, अशी मागणी भोगटे यांनी केली. यावेळी सुरेश भोगटे, विजय मुद्राळे, अभय पंडित, प्रवीण वाडकर, कुशाल सुराणा, वैभव तानावडे, महंमद व्हेंसेंन, महेश नार्वेकर आदी उपस्थित होते. 

नऊ रुग्ण आढळल्याने धोका 
खांडेकर म्हणाले, 100 मीटर पर्यंत कंटेनमेंट झोन कायम राहील. याबाबत पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याशी चर्चा करेन. चितार आळीत सापडलेले दाम्पत्य अनेकांच्या संपर्कात असल्यामुळे झोन कमी करता येणे अशक्‍य आहे. याठिकाणी शंभर मीटरच्या आतील सर्व व्यवहार व वाहतूक बंद राहील. आपत्कालीन परिस्थितीत झोनच्या बाहेर नेण्याची परवानगी देऊ शकतो. त्या ठिकाणी नऊ रुग्ण सापडल्यामुळे हा भाग धोकादायक आहे. तरीही व्यापाऱ्यांच्या दृष्टीने विचार करून दीड किंवा दोन तासासाठी येथील होलसेल व्यापाऱ्यांचा माल बाहेर नेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करू. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com