ओढ्यात टाकली कोळशाची राख; कामथेत नदीचे पाणी दुषित 

नागेश पाटील
Sunday, 19 July 2020

मुंबई-गोवा महामार्गावर कामथे कोंडमळा सीमेवरील भैरी मंदिराजवळील ओढ्यात टॅंकरमधून कोळशाची राख टाकण्यात आली होती. परिणामी कामथेमधील नदीचे पाणी दूषित झाले आहे.

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे कोंडमळा सीमेवरील भैरी मंदिराजवळील ओढ्यात टॅंकरमधून कोळशाची राख टाकण्यात आली होती. परिणामी कामथेमधील नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे कामथे बु. ग्रामपंचायतीने नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या प्रकरणी एकावर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून टॅंकरही जप्त करण्यात आला. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे, कोंडमळा सीमेवर हा प्रकार गुरुवारी सायंकाळी 5.45 वाजता घडला होता. या प्रकरणी पागझरी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा फुरूस येथील नदीतील प्रकाराशी संबंध असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

संदेश सूर्यकांत लटके (48) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या घटनेची फिर्याद प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अजय दौलत चव्हाण यांनी दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संदेश हा गुरुवारी (ता.16) सायंकाळी 5.45 वाजता टॅंकर घेऊन कामथे खुर्द येथील भैरी मंदिराजवळ गेला. तेथील एका ओढ्यात तो टॅंकरमधील राख ओतत होता. त्यामुळे ओढ्याच्या पाण्याला फेस येऊन ते पांढरे शुभ्र दिसत होते. हा प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला अटकाव केला. तसेच याची माहिती पोलिस व प्रदूषण मंडळाला दिली. 

त्यानुसार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन त्याची चौकशी केली. यावेळी ही कोळशाची राख असल्याचे त्याने सांगितले. या ओढ्याचे पाणी गावातील नदीला मिळत असल्याने राखेमुळे ते दूषित झाले आहे. त्यामुळे पाणी दूषित करण्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल मोहिते करीत आहेत. 

फुरूस येथील नदीतही असाच प्रकार... 
काही दिवसांपूर्वी फुरूस येथील नदीतही अज्ञाताने काहीतरी टाकल्याने पाणी शुभ्र होऊन फेस आला होता. तसाच प्रकार कामथे येथे घडल्याने याचा फुरूस येथील प्रकाराशी संबंध असण्याची शक्‍यता वर्तवली जात असून पोलिस त्या दृष्टीनेही तपास करणार आहेत. या राखेचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कामथे बु. ग्रामपंचायतीनेही नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. 

रत्नागिरी 

रत्नागिरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contaminated river water in Kamath