मंडणगड तालुक्‍यात कोट्यवधींचे सिंचन तरीही शेत जमीन कोरडीच 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 May 2019

एक नजर

  • मंडणगड तालुक्‍यात मध्यम व लघु आकाराच्या पाच धरणांवर कोट्यवधींचा खर्च
  • तरीही प्रकल्प 40 वर्षांनंतरही अर्धवट
  • तालुक्‍यातील शेत जमीन कोरडीच
  • चिंचाळी, तुळशी, पणदेरी, भोळवली, तिडे अशी मध्यम व लघु आकाराची पाच धरणे
  • माती धरणाच्या या प्रकल्पात मुख्य भिंतीत गळती किंवा कालव्यांची कामे अर्धवटस्थितीत. 

मंडणगड - तालुक्‍यात मध्यम व लघु आकाराच्या पाच धरणांवर कोट्यवधींचा खर्च केला. तरीही हे प्रकल्प 40 वर्षांनंतरही अर्धवट असून तालुक्‍यातील शेत जमीन कोरडीच राहिली आहे. चिंचाळी, तुळशी, पणदेरी, भोळवली, तिडे अशी मध्यम व लघु आकाराची पाच धरणे आहेत, माती धरणाच्या प्रकल्पातील ही धरणे एक तर मुख्य भिंतीत गळती किंवा कालव्यांची कामे अर्धवट या दोन प्रमुख समस्यांमध्ये अडकली आहेत. 

मंडणगड तालुक्‍यात 1979 ला चिंचाळी हे पहिले धरण बांधण्याची सुरवात झाली. 40 वर्षांनंतरही तांत्रिक दोषांमुळे ते आजही पूर्ण झालेले नाही. उरलेल्या तुळशी, पणदेरी, भोळवली या तीन धरणांची कामे 60 ते 90 टक्क्‌यांपर्यंतच पूर्ण झाली आहेत. तर यावर्षीच पाणीसाठा केलेले नवीन तिडे या बहुचर्चित धरणाच्या कालव्याचे काम पूर्णत्वास गेलेले नाही.

चार धरणांमुळे तालुक्‍यातील 1346 हेक्‍टर जमीन ओलिताखाली येण्याची अपेक्षा होती. परंतु एक हेक्‍टरही जमीन ओलिताखाली आली नसल्याचे वास्तव आहे. हे स्थापत्यशास्त्रातील तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे की यंत्रणेला लागलेल्या गळतीमुळे याची उत्तरे गुलदस्तात आहेत. मात्र प्रत्येकवेळी निधीचा अभाव हेच कारण पुढे केले जाते. या धरण परिसरातील शेती वा अन्य कारणांकरिता यातील पाण्याचा वापर प्रत्यक्षात कधी सुरू होईल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे दुबार शेतीचे स्वप्न सत्यात उतरेल की नाही याची शंका आहे.

रोजगार स्थलांतरामुळे जमिनी ओस पडत असल्याने शेतीसाठी या पाण्याचा उपयोग का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी शासकीय यंत्रणेला विचारलेला नाही. डागडुजीवर अधिक खर्च करण्यात आला आहे. धरणातून गाळ भरला असून तुटलेले कालवे बुजायला लागले आहेत. त्याकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे मूळ उद्देशच साध्य न झाल्याने ही धरणे फक्त निधी खर्च करण्याची माध्यम ठरली आहेत. 

धरणांवरील खर्च 
चिंचाळी - 10 कोटी 
भोळवली- 22 कोटी 10 लाख 
पणदेरी- 7 कोटी 55 लाख 
तुळशी- 2 कोटी 55 लाख 
तिडे- 93 कोटी 95 लाख (मूळ प्रकल्प) 
अंदाजे - 60 कोटी खर्च (आत्तापर्यंत) 

ओलिताखाली येणारे क्षेत्र- 1346 हेक्‍टर 
चिंचाळी- 138 
भोळवली- 330 
तुळशी- 101 
पणदेरी- 255 
तिडे- 522 (हेक्‍टर) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cores of Irrigation projects but no water for farms