आंबा वाहतुकीतून रत्नागिरी, सिंधुदुर्गात कोट्यवधींची उलाढाल 

राजेश कळंबटे
शुक्रवार, 10 मे 2019

एक नजर

  • कोकणच्या हापूसची सर्वाधिक विक्री मुंबई, पुणे बाजारपेठेत.
  • हंगामातील तीन महिन्यात आंबा वाहतुकीतून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोट्यवधीची उलाढाल. 
  • गाडी नेण्यासाठी चालक नेमला तर त्याला एका फेरीला किमान दीड हजार रुपये मानधन
  • चारचाकी गाडी मालकाला किमान साडेतीन ते चार हजार रुपये भाडे. 

रत्नागिरी - कोकणच्या हापूसची सर्वाधिक विक्री मुंबई, पुणे बाजारपेठेत होते. बागायतदारांकडील हापूसच्या पेट्या एकत्रित करुन त्या वाहतूक कंपनीमार्फत बाजारात पाठविण्यात येतात. हंगामातील तीन महिन्यात या वाहतुकीतून कोट्यवधीची उलाढाल रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते. गाडी नेण्यासाठी चालक नेमला तर त्यालाही एका फेरीला किमान दीड हजार रुपये मानधन दिले जाते, तर चारचाकी गाडी मालकाला किमान साडेतीन ते चार हजार रुपये भाडे मिळते. 

कोकणची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या आंबा व्यवसायातून हजारो कोटींची दरवर्षी उलाढाल होते. मार्चपासून हंगाम सुरु होतो. बागेतून काढलेला आंबा गोडावूनला असून पेटी किंवा बॉक्‍समध्ये भरला जातो. ती पेटी मुंबई, पुण्यातील बाजारात पाठविण्यात येते. त्यासाठी वाहतूक कंपनीचे सहकार्य घेतले जाते.

बाजारपेठेत सकाळच्या सत्रात आंब्याची खरेदी-विक्री होते. त्यामुळे रात्री 12 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीच्या विविध भागातून पेट्या भरलेल्या गाड्या रवाना होतात. एका पेटीसाठी 90 रुपये आणि दहा रुपये कामगाराचे आकारतात. गाडी मालक नसला तरी तात्पुरता चालक तिथे पाठविला जातो. मालक स्वतः असेल तर फायदा अधिक होतो.

हौदा असलेल्या चार चाकी गाडीतून सुमारे 130 पेट्या नेण्यात येतात. मोठ्या गाड्यांमधून तीनशे,पाचशे तर ट्रकमध्ये अधिक पेट्या भरल्या जातात. आंबा वाहतुकीतून हंगामात वाहन मालक-चालक लाखो रुपये कमवतात. चारचाकी गाडीच्या एका फेरीला किमान दहा ते बारा हजार रुपये मिळतात. इंधन, चालकाचा पगार यासह गाडीचा घसारा खर्च वगळून चार ते साडेचार हजार रुपये सुटतात. मोठी गाडी असेल तर सुमारे बारा ते पंधरा हजार रुपये मिळतात. यामध्ये वर्षाचा हप्ता दोन महिन्यात कमवण्यावर भर असतो. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे वाहतुकीच्या फेऱ्यांवरही परिणाम झाला आहे. 

धोकाही अधिक 
गाडीमध्ये वजन असल्यामुळे वाहतूकदार,गाडीचा मालक आणि चालक यांची तेवढीच जबाबदारी राहते. उन्हाळी सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांची संख्या अधिक असते. अनेक गाड्यांचे अपघातही होतात. हा धोका पत्करुनच हा व्यवहार सुरु असतो. तसेच बागायतदारांच्या पेट्यांची माहिती लिखित स्वरुपात दलालाकडे दिली जाते. एखादी पेटी अधिक गेली, तर ती दलाल स्वीकारत नाहीत. 
 
प्रतिदिन तीन हजार पेट्यांची उलाढाल 
आंबा ट्रान्सपोर्ट करणारे रत्नागिरी तालुक्‍यात सुमारे बारा ते पंधरा व्यावसायिक आहेत. चिपळूण, दापोलीसह अन्य तालुक्‍यातही काही प्रमाणात असे वाहतूकदार आहे. सिंधुुदुर्ग जिल्ह्यातूनही अशी वाहतूक होते. सध्या दिवसाला एका वाहतूकदाराकडून सरासरी तीन हजार पेट्या मुंबई, पुण्याकडे रवाना होतात. 

गाडीत आंबा पेटी भरुन दिली की मुंबई, पुण्याकडे ती व्यवस्थितपणे नेण्याची जबाबदारी चालकाची असते. मार्केटमध्ये वेळेत नेण्यासाठी संबंधितांकडून सूचना असतात. गाडी चालविण्याचा मोबदला संबंधित मालकांकडून आम्ही घेतो. 
- गुरु सावंत,
वाहन चालक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cores turnover from Ratnagiri, Sindhudurga through Mango Transportation