esakal | एकट्या नवऱ्याचीच वरात निघते तेव्हा... 

बोलून बातमी शोधा

Corona Awakening Shigmotsav otavane sindhudurg

गावात सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेणाऱ्या या नवऱ्याला लोकांनी आहेर तर दिले; मात्र आहेर घेणाऱ्या या नवऱ्याने लाडू नाही तर मास्क वाटप केले. कुतुहल ठरलेला हा नवरा ओटवणेचा कलावंत. बहुरूपी कलेत माहीर असलेला प्रमोद श्रीधर गांवकर. औचित्य होते ते ओटवणे शिमगोत्सवाचे. 

एकट्या नवऱ्याचीच वरात निघते तेव्हा... 
sakal_logo
By
महेश चव्हाण

ओटवणे (सिंधुदुर्ग) -  "उगाच घरातून बाहेर पडू नका', "मास्क वापरा', "सामाजिक अंतर ठेवा', "कोरोनापासून सावधान', "गर्दी करू नका', असे विविध संदेश लिहिलेली छत्री घेवून चक्क एकट्या नवऱ्याची दुचाकीवरुन वरात ओटवणेतून निघाली. सोबत कोरोना विषयी कोणती काळजी घ्यावी या विषयाचा आशय असलेला डीजे देखील या एकट्याच्या वरातीत सोबत होता. त्यामुळे गावात सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेणाऱ्या या नवऱ्याला लोकांनी आहेर तर दिले; मात्र आहेर घेणाऱ्या या नवऱ्याने लाडू नाही तर मास्क वाटप केले. कुतुहल ठरलेला हा नवरा ओटवणेचा कलावंत. बहुरूपी कलेत माहीर असलेला प्रमोद श्रीधर गांवकर. औचित्य होते ते ओटवणे शिमगोत्सवाचे. 

यावर्षी काही कारणास्तव पुढे गेलेला ओटवणे 7 दिवसीय शिमगोत्सव शनिवारी रंगपंचमी साजरी करत धार्मिक, पारंपरिक पद्धतीने पार पडला. कोरोनामुळे हा उत्सव साधेपणे झाला; पण त्यादिवशी या सोहळ्याला बहुरूपी कलावंत गांवकर यांनी "चार चॉंद' लावले. थेट नवऱ्याची वेशभूषा सादर करत दुचाकीने वरात काढली. ही वरात शिमगोत्सवात केवळ मनोरंजन करत नव्हती तर आजच्या घडीला प्रलयकारी कोरोनापासून बचाव करण्याबाबत प्रबोधन करीत होती. त्यासाठी या कलावंताने डोक्‍यावर घेतलेल्या छत्रीवर कोविड 19 संदर्भात विविध उपाययोजना नोंदविल्या होत्या. शिवाय छोट्या साउंड सिस्टीमद्वारे मंगलाष्टकासह विविध माहितीची ध्वनीफितही अधुनमधून लावली जात होती. 

वाटसरुने कला बघुन आहेर दिलाच तर त्याला मास्क सुद्धा हा बहुरूपी देत होता. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन करणारे ओटवणे देऊळवाडी येथील प्रमोद हे यंदा शिमगोत्सवात विशेष आकर्षण ठरले. सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्या या अभिनव प्रबोधनपर उपक्रमाचे ओटवणेतून विशेष कौतुक झाले. 

ओटवणे शिमगोत्सवात दरवर्षी कला सादर करतो; पण यंदा कलेच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणि प्रबोधनपर विचाराने संकटाची जाणीव व्हावी हा उद्देश होता. लोकांनी कोरोना काळात स्वतः ची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी. गाव सुरक्षित रहावा. 
- प्रमोद गांवकर, ओटवणे 

संपादन - राहुल पाटील