मूर्तीकारांच्या चिंता संपता संपेनात! आता `हे` आव्हान 

भूषण आरोसकर
Thursday, 23 July 2020

पीओपीच्या मूर्ती जिल्ह्यातील मूर्तिकारांच्या स्पर्धेत असतात; मात्र अलीकडच्या काळात पीओपीला टक्कर देत मूर्तिकारांनी मातीच्या मूर्तीत चांगली आकर्षकता व सुबकता येण्यासाठी जीव ओतला आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या काही दिवसांपासून अनेक मूर्ती शाळांमध्ये रंगकाम सुरुवात झाली आहे. यंदा मोठ्या बाजारपेठा बंद असल्याने अनेक मूर्तिकारांना स्थानिक बाजारपेठेत रंग साहित्य खरेदी करावे लागणार आहे. पाहिजे तसे रंग यावर्षी मूर्तिकारांना उपलब्ध होऊ शकले नसल्याने थोडीशी नाराजी आहे. स्थानिक बाजारपेठेतून मूर्तिकारांना मुंबई बाजारपेठ जाऊ न शकल्याने रंगासाठी हजारामागे किमान 200 रुपये ज्यादा रक्कम मूर्तिकारांना मोजावी लागणार आहे. 

गेली काही दिवस मूर्तिकार गणेश मूर्ती बनवण्याच्या धावपळीत होते. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चारही बाजूने समस्या उभ्या ठाकल्या असतानाही मूर्तीकला जिवंत ठेवण्यासाठी मूर्तिकारांकडून प्रयत्न केले गेले. मूर्तिकारांच्या समस्यांमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे पीओपीच्या मूर्तींचीच आहे. आकर्षकता आणि सुबकता यासाठी पीओपीच्या मूर्ती जिल्ह्यातील मूर्तिकारांच्या स्पर्धेत असतात; मात्र अलीकडच्या काळात पीओपीला टक्कर देत मूर्तिकारांनी मातीच्या मूर्तीत चांगली आकर्षकता व सुबकता येण्यासाठी जीव ओतला आहे.

वाचा - सिंधुदुर्गात दिवसात दहाजण कोरोनाबाधित, दोघे आमदारांच्या संपर्कातील

त्यामुळे मूर्तीच्या वजनाचा विचार सोडला तर पीओपीपेक्षाही मातीच्या मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मातीच्या मूर्तीची आकर्षकता वाढवण्यासाठी मूर्तिकार तेवढ्यात गरजेचे चांगल्या प्रतीचे रंग मूर्ती रंगविण्यासाठी वापरतात. त्यामुळे गणेश मूर्ती बनविताना मूर्तीकाराला रंग कामाच्या खर्चाचाही भार पेलावा लागतो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मूर्तिकारांना दोन - तीन महिन्यापासून मूर्ती रंगकामासाठी रंग साहित्य उपलब्धतेबाबत समस्या जाणवत होती.

मूर्तीकाम पूर्ण झाल्याने आता मूर्तिकार रंगकामाकडे वळला आहे; मात्र मूर्तिकारांना यावर्षी मुंबई, कोल्हापूर यांसारखे मोठ्या बाजारपेठांचे दरवाजे वाहतूक व्यवस्थेअभावी बंद असल्याने स्थानिक बाजारपेठ रंग साहित्य खरेदी करण्याची वेळ आली आहे. दरवर्षी मूर्तिकार एकत्रितरीत्या लागणारे साहित्य मुंबई-पुण्यासारख्या बाजारपेठेत जाऊन खरेदी करत. मोठ्या बाजारपेठेत होलसेल रंग व रंग साहित्य खरेदी केल्याने मूर्तिकारांना रंग मागे चांगली सूट मिळत असे. याचा फायदा जिल्ह्यातील अनेक मूर्तिकारांना होत असे.

एकत्रितरित्या रंग साहित्य खरेदी केल्याने मूर्तिकारांच्या महिन्यानुसार किमान दर हजारी रुपयामागे दोनशे ते अडीचशे रुपये एवढी सूट मिळत असे. त्यामुळे सरासरी 50 हजार खर्चामागे चार ते पाच हजार रुपये बचत निश्‍चित होत असे; मात्र यावर्षी निश्‍चितच वाहतूक व्यवस्था लॉकडाऊनमुळे बंद असल्याने स्थानिक बाजारपेठावरच मूर्तिकारांना अवलंबून रहावे लागले आहे. गेले काही दिवस पाहता हळूहळू शहरातील मुख्य बाजारपेठेत रंग साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. मुर्तीकरांच्या मते यंदा मूर्ती कामासाठी हवे तसे रंग उपलब्ध नसल्यामुळे थोडीशी नाराजी आहे.

हेही वाचा - वैभव नाईक : तत्काळ होम क्वारंटाइन व्हा ,प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा...

मुंबई बाजारपेठेतून रंग साहित्यासह मूर्तिकार विविध आकर्षक चकाकी देणारे खडे, मणी, आकर्षक हार असे लक्ष वेधून घेणारे अलंकारही खरेदी करता येत असे तसेच मूर्ती साहित्यामध्ये लागणारे इतर विविध प्रकारचे साहित्य हेसुद्धा सोबत येताना मूर्तिकार घेऊन येई. यंदाचे वर्ष आर्थिक समस्येतून घालवावी लागेल, अशी प्रतिक्रिया "सकाळ'शी बोलताना मूर्तिकार देत आहेत.

सद्यस्थिती पाहता रंग साहित्याच्या दुकानांमध्ये मूर्तिकारांची गर्दी होत असून पूर्वीपेक्षाही यंदाच्या वर्षी स्थानिक बाजारपेठेत ग्राहक रंग खरेदीसाठी दाखल झाला असल्याची प्रतिक्रिया दुकानदारातून मिळत आहे. रंग साहित्याच्या दुकानात पूर्वी करून ठेवलेला साहित्याचा पुरवठा यामुळे स्थानिक रंग दुकानातील व्यापाऱ्यांची चलती आहे. असे असले तरी यंदा गोवा राज्यातील दरवर्षी येणारे ग्राहक मात्र दिसून येत नाहीत. दरवर्षी येणारे ग्राहक दुकानांमध्ये दिसून येत आहे. 

दरवाढ नाही 
यंदा रंगाच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याचे काहींनी सांगितले. गेल्या वर्षी रंग साहित्यावर 28 टक्के जीएसटी या वर्षी 18 टक्के केल्याने त्याचा फायदा मात्र निश्‍चितच व्यापारी तसेच ग्राहकांना झाला आहे. स्थानिक बाजारपेठ यांच्या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यामध्ये ग्राहकांना पुरणार एवढा माल रंग साहित्याच्या दुकानात उपलब्ध आहे. 

हेही वाचा - बोरखत कातळावर पुन्हा अवतरले  स्वच्छतादूत  : आठ वर्षांनी ६५ गिधाडांचे दर्शन...

काहीशी सुट 
मूर्ती शाळेतील 100 मूर्तीमागे सरासरी जवळपास 25 ते 30 हजार रुपये एवढा खर्च येतो. दर्जेदार व जास्त किमती असलेल्या रंग कामाच्या साहित्यासाठी 100 मूर्तींसाठी 30 ते 35 
हजार रुपये एवढा खर्च येत असतो. मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत या खर्चात थोडीशी सूट मिळते. 

गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी स्थानिक ग्राहकाचा रंग साहित्य खरेदी करण्यासाठी जास्त कल दिसून येत आहे. रंग साहित्याचा पुरेसा साठा असल्याने कोणत्या प्रकारची चिंता नाही. या वर्षीच्या जीएसटीचा फायदा निश्‍चितच होईल. 
- अनय स्वार, साहित्य व्यापारी, बांदा 

दरवर्षी मुंबईहून विविध प्रकारचे रंग रंग साहित्य खरेदी करता येत होते या वर्षी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागणार आहे. तरीही मूर्तीची आकर्षकता वाढविण्यावर मूर्तिकार यांचा भर असेल. 
- गुरुदास गवंडे, मूर्तिकार तथा उपसरपंच निगुडे 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona crisis on Ganesh sculptors