एकजूटच परतवून लावेल कोरोना

निलेश मोरजकर
शनिवार, 11 एप्रिल 2020

"सकाळ'च्या या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधून "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर इंग्लडची स्थिती जाणून घेतली. 

बांदा (सिंधुदुर्ग) -  "कोरोना' हे जैविक संकट आहे. ते हलक्‍यात घेऊन चालणार नाही. विकसित देशांनीही त्याच्यासमोर हात टेकलेय. इंग्लंडमध्ये शिस्तबद्ध लॉकडाऊन सुरू असूनही तेथे फैलाव झाला आहे. विशाल लोकसंख्या असलेल्या भारताने सध्यातरी यावर चांगले नियंत्रण मिळवले आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी नागरिकांची एकजूट असल्याच्या भावना मूळ बांदा येथील व नोकरीनिमित्त अकरा वर्षांपासून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले सीताराम राजेंद्रप्रसाद वाळके यांनी व्यक्त केली. "सकाळ'च्या या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधून "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर इंग्लडची स्थिती जाणून घेतली. 

जगव्यापी "कोरोना'ने घातलेल्या धुमाकुळाने आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. हजारो जणांचा बळी "कोरोना'ने घेतला आहे. या रोगाने गरीब-श्रीमंत ही दरीच मिटवून टाकली आहे. सर्वसामान्यांबरोबरच जगभरातील सर्वोच्च नेते, कलाकार हे देखील "कोरोना'च्या विळख्यात सापडले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना देखील "कोरोना'ने ग्रासले आहे. जगातील 204 देश "कोरोना'ने बाधित झाले आहेत. "कोरोना'ला रोखण्यासाठी अद्याप सक्षम पर्याय उपलब्ध नसल्याने जगभरात 80 टक्के जनता लॉकडाऊन आहे. जगभरातील सर्व देशांची अर्थव्यवस्था ढासळली आहे. 

सीताराम यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले, की भारतातील स्थिती इतर देशांच्या तुलनेत गंभीर नाही; मात्र याकडे दुर्लक्ष न करता लोकांनी सरकारने सांगितलेले नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. "कोरोना'शी लढायचे असेल तर सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्‍यक आहे. गेली 11 वर्षे इंग्लंडमध्ये राहतो आहे. प्रसिद्ध मॅंचेस्टर जवळील स्टॉकपोर्ट शहरात कुटुंबासोबत वास्तव्य आहे. पत्नी स्नेहल व 2 मुलींसोबत सध्या लॉक डाऊनमुळे घरीच आहे. 

इंग्लंडमध्ये आतापर्यंत 61 हजार "कोरोना' बाधित रुग्ण सापडले आहेत. 7 हजारहून अधिक रुग्ण दगावले आहेत. आमच्याकडे केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू आहे. "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत स्थानिक प्रशासन वेळोवेळी नागरिकांना सूचना देत आहे. या ठिकाणी देखील वर्क फ्रॉम होमचे आदेश आहेत. मी गेल्या 2 आठवड्यांपासून घरूनच काम करत आहे. देशातील अनेक उद्योगधंदे बंद असल्याने अशा व्यावसायिकांसाठी सरकारने मदत योजना जाहीर केल्या आहेत. इंग्लंडची लोकसंख्या मर्यादित असून हा प्रगत देश आहे; मात्र त्या तुलनेत भारत अर्थव्यवस्था सक्षम नसल्याने सर्व नागरिकांनी एकजूट दाखवावी. 

त्यांनी पुढे सांगितले की, भारतात अजूनही काही ठिकाणी लोक लॉकडाऊनचे गांभीर्य लक्षात घेत नाहीत; मात्र याठिकाणी लॉकडाऊनचे नियम व सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळण्यात येते. या ठिकाणी जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी व अत्यंत मर्यादित हेतूंसाठीच घर सोडण्याची परवानगी आहे. या ठिकाणी देखील नियमांचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येते. येथील प्रशासन व सर्व अत्यावश्‍यक सेवा देणारे विभाग अत्यंत नियोजनबद्ध काम करत आहेत. या ठिकाणी अत्यावश्‍यक सेवा देणारी आस्थापने सुरू आहेत; मात्र लोकांना मर्यादेहून अधिक अधिक वस्तू खरेदी करण्याची परवानगी नाही. या ठिकाणी गाव तसेच शहर पातळीवर लोकांच्या मदतीसाठी गट तयार आहेत. या माध्यमातून वैद्यकीय व जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येतो. 

भारतातही विशेषतः महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढती आहे. हा विषाणू त्वरित पसरू शकतो. सर्वकाही सरकारची जबाबदारी ही मानसिकता न ठेवता प्रत्येकाने हे देशावरील जैविक संकट असल्याच्या भावनेतून काम करणे गरजेचे आहे. भारत सरकारने इतर कोणत्याही देशांपेक्षा वेगवान पाऊले उचलली आहेत. रुग्णसंख्या वाढू न देणे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
- सीताराम वाळके 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona impact england