सावधान ! मालवण शहरात कोरोनाचा शिरकाव 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून मालवण शहर कोरोनामुक्त राखण्यात प्रशासनाला यश आले होते; मात्र आज शहरात कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहरवासीयांमध्ये घबराट पसरली आहे.

मालवण ( सिंधुदुर्ग ) - कोरोनामुक्त मालवण शहरात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला. 30 जुलैला तासगाव-सांगली येथून शहरात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये एक जण तहसील कार्यालयाचा कर्मचारी असून दुसरा एका बॅंकेत कर्मचारी आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना तपासणी होणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी दिली. 

कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून मालवण शहर कोरोनामुक्त राखण्यात प्रशासनाला यश आले होते; मात्र आज शहरात कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहरवासीयांमध्ये घबराट पसरली आहे. ग्रामीण रुग्णालयात आज केलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये हे दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले आहेत. यातील एक जण शहरातील एका बॅंकेचा कर्मचारी आहे तर दुसरा तहसील कार्यालयाचा कर्मचारी आहे. हे दोघेही जण तासगाव, सांगली येथून 30 जुलै रोजी येथे आले होते. या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. बॅंक कर्मचारी हा बांगीवाडा तर तहसील कर्मचारी मेढा येथील रहिवासी आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती डॉ. बालाजी पाटील यानी दिली. 

"" मालवणात प्राथमिक तपासणीत दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील एक व्यक्ती होम क्वारंटाईन होती. तर दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात नागरिक येण्याची शक्‍यता कमीच आहे. यामुळे संबंधित व्यक्ती यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकाने आपले आरोग्य तपासणी करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधावा. मालवणवासियांनी घाबरून जाण्याची गरज नाही रुग्णांच्या संपर्कातील लोकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊन आरोग्य तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. मालवण पालिकेकडून आवश्‍यक खबरदारी घेतली जात आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीना तपासण्यासाठी जाताना काही अडचणी आल्यास त्यांनी पालिकेशी संपर्क साधावा.'' 
- राजन वराडकर, उपनगराध्यक्ष, मालवण पालिका 

"" शहरात आढळून आलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण तहसील कार्यालयातील असल्याने नागरिकांनी अत्यावश्‍यक कामाखेरीज तहसील कार्यालयात येऊ नये.'' 
- अजय पाटणे, तहसीलदार, मालवण. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Patient Found In Malvan City SIndhudurg Marathi News