रत्नागिरीत कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले

राजेश कळंबटे
Sunday, 18 October 2020

अडीचशे चाचण्यांमध्ये अवघे 17 रुग्ण बाधित आहेत.

रत्नागिरी : कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. मागील चोविस तासात अवघे 17 रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही; मात्र मागील दोन दिवसातील दोन मृतांमुळे आकडा 304 वर पोचला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 3.70 टक्के आहे. अडीचशे चाचण्यांमध्ये अवघे 17 रुग्ण बाधित आहेत. त्यात आरटीपीसीआरमधील 8 आणि अ‍ॅण्टीजेनमधील 9 रुग्णांचा समावेश आहे. 

हेही वाचा - कोकणात घरात सापडली दहा किलो वजनाची घोरपड -

मंडणगड, गुहागर, संगमेश्‍वर, राजापूर तालुक्यात एकही बाधित नाही. दापोली 4, खेड 5, चिपळूण 1, रत्नागिरी 6, लांजा 1 रुग्ण आहेत. 15 आणि 17 ऑक्टोबरला मृत पावलेल्या मंडणगड, चिपळूण तालुक्यातील दोन रुग्णांची आज माहिती प्राप्त झाली आहे. 17 व 18 ऑक्टोबर या दोन दिवसात 1,022 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 35 जणं बाधित आढळले. 

रुग्ण तपासणीचे प्रमाण कमी झालेले नाही. जास्तीत जास्त लोकांनी तपासणी करुन घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. बरे होणार्‍यांचे प्रमाण वाढले असून आज 115 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 7,542 रुग्ण बरे झाले आहे. बरे होण्याचा दर 91.83 टक्के आहे. कोरोना बाधितांपैकी 272 जणं विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

 एकुण बाधित  - 8,213
 एकुण निगेटीव्ह - 45,670
 एकुण बरे झालेले - 7,542
 मृत पावलेले - 304
 उपचाराखालील  - 272

हेही वाचा -  भेदरलेल्या अवस्थेत रस्त्यावर सापडलेल्या दोन वर्षाच्या खवल्या मांजराला मिळाले जीवदान -

"कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. त्यापासून मुक्त राहण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक आहे. न वापरणार्‍यांवर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षकांबरोबर चर्चा झाली आहे. कारवाईपेक्षा नागरिकांनी स्वतःहून काळजी घेतली पाहिजे."

- उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients decreased in ratnagiri but 3. 70 percent is a dead rate in ratnagiri