निष्काळजीपणाचा कळस! बाधिताचा मृतदेह नातेवाईकांकडे देण्याची तयारी

निलेश मोरजकर
Wednesday, 12 August 2020

याबाबत विचारणा केली असता आमच्याकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी सुविधा नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. आम्ही तुम्हाला पीपीई किट देतो, तुम्ही मृतदेह घेऊन जा असेही कुटुंबियांना सांगण्यात आले.'' 

बांदा (सिंधुदुर्ग) - येथील कोरोनाबाधित तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची तयारी आरोग्य प्रशासनाने केली होती. नियमानुसार अंत्यविधी करण्याची जबाबदारीही प्रशासनाची असताना हलगर्जीपणा केल्याचा व आरोग्य प्रशासनावर कोणाचाही अंकुश नसल्याचा आरोप सरपंच अक्रम खान यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. 

वाचा - आंदोलने झाली, आश्वासने मिळाली, तरीही दुर्लक्षच! काय आहे हेवाळेची व्यथा? 

खान म्हणाले, ""शहरातील 40 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. नियमानुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता आरोग्य विभागाकडून अंत्यसंस्कार केले जातात; मात्र असे असताना आरोग्य विभागाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली. याबाबत विचारणा केली असता आमच्याकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी सुविधा नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. आम्ही तुम्हाला पीपीई किट देतो, तुम्ही मृतदेह घेऊन जा असेही कुटुंबियांना सांगण्यात आले.'' 

ते म्हणाले, ""यावेळी कुटुंबियांना रुग्णवाहिका देखील नाकारण्यात आली. त्यामुळे अखेर कुटुंबाने एका खासगी रुग्णवाहिका चालकाशी संपर्क साधला. त्यावेळी अंत्यविधीसाठी 17 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. नाईलाजास्तव कुटुंबाला यासाठी मान्यता द्यावी लागली. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने आरोग्य प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.

हेही वाचा - शिक्षकांच्या बदल्या, काहींचा आक्षेप! वाचा सिंधुदुर्गातील स्थिती...

कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने अंत्यविधीचे सतरा हजार रुपये भारतीय जनता पार्टी बांदा, देवस्थान समिती बांदा व ग्रामपंचायत बांदा यांच्या सहभागातून गोळा करण्यात आले. आरोग्य विभागाच्या बेजबाबदार वागणुकीचा फटका या कुटुंबाला बसला असून जिल्हा प्रशासनाने याबाबत आरोग्य विभागाच्या कारभाराकडे लक्ष द्यावे.'' 

संबंधितांशी संपर्क नाही 
याबाबत दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी फोन उचलला नाही तर जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकुरकर यांनी आपला फोन दुसऱ्या व्यक्तीकडे दिल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients issues banda konkan sindhudurg