esakal | रत्नागिरी शहरीभागात आजपासून कडक निर्बंध

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी शहरीभागात आजपासून कडक निर्बंध
रत्नागिरी शहरीभागात आजपासून कडक निर्बंध
sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्ह्यातील शहरी भाग आणि 5 हजार पेक्षा अधिक वस्ती असलेल्या भागात संचारबंदी कालावधीतील निर्बंध अधिक कडक केले आहेत. फळे, भाजी-पाला आणि दुध विकण्यास फक्त सकाळी 7 ते 11 पर्यंत परवानगी दिली आहे. मात्र इतर कोणतीही दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी नाही. त्यांनी घरपोच सेवा द्यायची आहे. ग्रामीण भागात किराणासह जीवनावश्यक वस्तू विकण्यास 7 ते 11 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे.

शासनाने आज हे नवे आदेश पारित केले आहे. त्यानुसार किराणा माल दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने, मटण, चिकन, पोल्ट्री, मासे आणि अंडीपदार्थ विक्री दुकाने, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधीत दुकाने ही पूर्णपणे बंद राहतील. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आदेश जारी कले आहेत. जिल्ह्यातील वैद्यकीय, आरोग्य सुविधा व मेडिकल दुकाने पूर्णवेळ खुली राहतील. मात्र नगरपालिका, नगरंपचायत हद्दीमध्ये तसेच ग्रामीण भागातील ज्या गावाची लोकसंख्या 5 हजारापेक्षा जास्त आहे, अशा ठिकाणी त्यांना केवळ घरपोच अन्नधान्याचे व सामानाचे वितरण करता येणार आहे. या भागात भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, विक्रेत्यांसाठी त्यांच्या मालाची विक्री सकाळी 7 ते 11 पर्यंत करता येईल. 11 नंतर दुकाने पूर्णपणे बंद राहतील.

ग्रामीण भागामध्ये (5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे) सर्व प्रकारची दुकाने, किराणा माल दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने सकाळी 7 ते 11 या कालावधीसाठी खुली राहतील व त्यांना याच कालावधीत विक्री करता येईल. शासकीय स्वस्त धान्य दुकाने व केरोसीन दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत चालू राहतील. सर्वांसाठी होम डिलेव्हरी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत लागू राहील. घरपोच सेवा पुरवणार्‍या सर्व कर्मचारी यांचे लसीकरण करणे आणि चाचणी करणे बंधनकारक राहील त्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना स्वत: कडे बाळगणे आवश्यक राहील.