रत्नागिरी :जिल्ह्यात कोरोनाचे "रि इन्फेक्‍शन' 

राजेश शेळके
Sunday, 18 October 2020

कोरोनामुक्त झालेल्या दोन विद्यार्थ्यांचे अहवाल पुन्हा बाधित आल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मंदावल्याने जनतेसह सर्व यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला; मात्र कोरोनावर मात केलेल्यांना पुन्हा कोरोना झाल्याचे उघड झाल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. ऍन्टीबॉडी तयार होऊन पुन्हा कोरोना होत नाही, या गृहितावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या "रि इन्फेक्‍शन'च्या पहिल्याच दोन केसेस सापडल्या आहेत; मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणे नव्हती. आरोग्य यंत्रणेने त्यावर अभ्यास सुरू केला आहे. 

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी कोरोनाचे रि इन्फेक्‍शन झाल्याच्या दोन केसेस आल्याचे सांगितले. जूनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कोरोना झाला होता, ते पुन्हा काही बाधितांच्या संपर्कात आले. त्यांची चाचणी केल्यानंतर त्यांचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले. या रि इन्फेक्‍शनमुळे कोरोना झालेल्यांना पुन्हा कोरोना होऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे. एकदा कोरोना झाला की, ऍन्टीबॉडीज तयार होतात. म्हणजे या विषाणूविरुद्ध लढणारी प्रतिकारक्षमता तयार होते. त्यामुळे पुन्हा कोरोना होण्याची शक्‍यता कमी असल्याचा दावा यापूर्वी आरोग्य यंत्रणेने केले होता; मात्र त्यावर आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला. त्यामुळे यंत्रणा चांगलीच कामाला लागली. वाढत्या प्रसारामुळे लॉकडाउन वाढविण्यात आले. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर सक्तीचे करण्यात आले. तरी गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात कहरच झाला. ऑक्‍टोबरमध्ये मात्र प्रभाव कमी कमी होत चालला आहे. गेल्या दोन दिवसांत अल्प रुग्ण सापडत आहेत. बरे होण्याचे प्रमाण 90 टक्केच्या वर गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आल्याने आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. 

जूनमध्ये कोरोनावर मात केलेले विद्यार्थी काही पॉझिटिव्हच्या संपर्कात आले. त्यांची पुन्हा चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना रि इन्फेक्‍शनची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. त्याबाबत आम्ही मार्गदर्शन मागविले आहे. 
- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona reinfection in Ratnagiri district