
कोरोना निर्बंधात शिथिलता; पर्यटनस्थळे निम्म्या क्षमतेने सुरू
ओरोस : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी घातलेले काही निर्बंध शिथिल करण्यात आले असून, नवीन आदेश लागू केले आहेत. त्यानुसार पर्यटनस्थळे, स्पा, उपहारगृहे, वॉटरपार्क, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा असणार नाहीत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे-ऑनलाईन तिकीट वितरीत करणारी जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे त्यांच्या नियमित वेळेनुसार खुली राहतील. पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. कोरोना नियमांचे पालन बंधनकारक राहील.
हेही वाचा: राज्यात कोरोना मृतांचा आलेख वाढला; दिवसभरात १८०६७ नव्या रुग्णांची भर
समुद्रकिनारे, बागा, उद्याने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत चालू राहतील. जलतरण तलाव, वॉटर पार्क - ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. रेस्टॉरंट्स, उपहारगृहे - जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट्स, उपहारगृहे ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणांवर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकाची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक असेल. रेस्टॉरंट्स, उपहारगृहे दररोज रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद राहतील. होम डिलीव्हरीला परवानगी असेल. नाट्यगृहे, चित्रपटगृहे - जिल्ह्यातील सर्व नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद राहतील. भजने, इतर सर्व स्थानिक, सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम - सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के एवढ्या लोकांना परवानगी असेल. लग्नसमारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये जास्तीत जास्त २०० लोकांना परवानगी असेल. मोकळ्या जागेत जास्तीत जास्त २०० किंवा त्या जागेच्या प्रत्यक्ष क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल एवढ्या व्यक्तींना परवानगी असेल.
हेही वाचा: वन नेशन-वन रजिस्ट्रेशन; जमिनीचे वाद आणि बनावट खरेदीपत्रं रोखण्यास होणार मदत
८१ टक्के लोकांचे दोन डोस पूर्ण
जिल्ह्यातील ३० जानेवारीला १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या एकूण लोकसंख्येच्या ९९.८४ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला असून ८१.९५ टक्के लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ‘कोविड-१९’ ओमिक्रोन विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी सिंधुदुर्गसाठी १० जानेवारीच्या आदेशान्वये लागू केलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे.
Web Title: Corona Restriction Relaxation Tourism Start Half Capacity
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..