आता शिक्षक, विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी होण्याची शक्यता ?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोविड-19 ची चाचणी 17 ते 22 नोव्हेंबर दरम्यान करणे बंधनकारक आहे.

रत्नागिरी : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील नववी, दहावी व बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आदेश दिला आहे. वर्ग सुरू होण्यापूर्वी शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोविड-19 ची चाचणी 17 ते 22 नोव्हेंबर दरम्यान करणे बंधनकारक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची चाचणी करावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी दिली. 

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोविड-19 ची चाचणी शाळेनजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करावी तसेच विद्यार्थ्यांची चाचणी त्यांच्या राहत्या घराजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात यावी, अशी मागणी अध्यापक संघाने केली आहे. सुरक्षिततेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांचीही चाचणी होणे आवश्‍यक आहे, असे मत सागर पाटील यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा - शेतकऱ्यांना दिलासा ; एकाच दिवसात दहा टन झेंडुच्या फुलांची विक्री -

घराघरांत संसर्गाचा धोका 

शिक्षक व कर्मचाऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांच्या कोविड-19 चाचणीबाबत कोणताही उल्लेख परिपत्रकात नाही. पटसंख्येच्या पन्नास टक्के विद्यार्थी शाळेत येणार आहेत. विद्यार्थ्यांना लागण झाल्यास मोठ्या प्रमाणावर घराघरांत लागण होण्याचा धोका आहे. या संदर्भात शिक्षक, पालकांमध्येही भीती आहे. शाळेत सामाजिक अंतर कायमस्वरूपी ठेवणे शक्‍य होणार नाही. 
 
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona testing of students and teachers for precaution in ratnagiri