तरीही त्या कोरोना रुग्णांना भेटतात आणि दिलासा देतात ; कोकणात अशाही एक कोरोना योद्धा

मकरंद पटवर्धन
Thursday, 17 September 2020

मी रोज तीन तास जात आहे. पीपीई किट वापरून संवाद साधते.

रत्नागिरी : गेले सहा महिने रत्नागिरी कोरोना महामारीशी लढा देत आहे. मनात प्रचंड अस्वस्थता, अनेक प्रश्‍न, घरच्यांची काळजी अशा मानसिकतेत समाज पुढे जात आहे. डॉक्‍टर, परिचारिका, वॉर्डबॉय या कोरोना योद्ध्यांबरोबर बाधित रुग्णांशी संवाद साधून त्यांना आत्मविश्‍वास देण्याचे काम निवृत्त शिक्षिका तेजा मुळ्ये करीत आहेत. त्यासुद्धा कोरोना योद्धा ठरल्या आहेत.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकार लक्ष्य, कृषी समिती सभा वादळी

या संदर्भात मुळ्ये म्हणाल्या, की आयटीआयजवळ ॲपेक्‍स कोविड रुग्णालयात गेले १० दिवस सेवेसाठी जात आहे. हा अनुभव विलक्षण आहे. पुतण्या डॉ. सुशील व डॉ. मीरा मुळ्ये यांनी सुरू केलेल्या या रुग्णालयात रुग्णांबरोबर संवाद साधण्याची जबाबदारी सोपवली. मी रोज तीन तास जात आहे. पीपीई किट वापरून संवाद साधते. घाबरणाऱ्या रुग्णांना आत्मविश्‍वास, औषधे, आहार, उपचार यांची माहिती दिली की चांगला परिणाम होतो. दोन-तीन दिवसांत फरक जाणवतो. 

मुळ्ये साधारण ६०-६५ रुग्णांना भेटतात. रुग्णांची चौकशी करतात, शंका असतील तर डॉक्‍टरांशी संवाद साधून त्या रुग्णाला समजावून सांगतात. कर्मचारी आणि रुग्णांचे नाते छान तयार होण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यामुळे रुग्णांना एकटे वाटत नाही. कोरोनापासून जीव वाचविणे म्हणजे काय, ते हा आजार शिकवतो. जीव वाचला तरच पुढे सर्व सुख उपभोगता येणार आहे. त्यामुळे काटेकोर काळजी घेतली पाहिजे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - जुगार, मटक्याच्या टपऱ्या बंद, अवैध धंदेवाल्यांना पळताभूई थोडी

भित्यापाठी ब्रह्मराक्षस

‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ अशी म्हण आहे. त्यामुळे भीती बाळगू नका, समजून घ्या. घाबरलात तर हा आजार तुम्हाला कमजोर करेल. कीव करावी, भीती वाटावी, असे हे रुग्ण नाहीत. उपचारांची गरज, कसे राहावे, आहार काय असावा, चालणे, व्यायाम आदी काळजी घ्यावी, म्हणजे चुकून आजारी पडलात तरीही आठ दिवसांत स्वतः चालत आरामात घरी जाता येईल, येथे ज्येष्ठ रुग्णही बरे होताहेत, असे मुळ्ये यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona warriors one retired teachers meet a corona patients in hospital daily in ratnagiri