.तरच कोरोना शून्य मंडणगड अबाधित ; सुनील तटकरे

सचिन माळी
Wednesday, 22 April 2020


सभोवताली कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतानाही मंडणगड तालुका कोरोना शून्य आहे. तो तसाच शून्य ठेवण्यासाठी कडक अमलबजावणी प्रशासनाने करावी असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. 

मंडणगड (रत्नागिरी) : सभोवताली कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतानाही मंडणगड तालुका कोरोना शून्य आहे. तो तसाच शून्य ठेवण्यासाठी कडक अमलबजावणी प्रशासनाने करावी असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र काही पातळींवर अजूनही तालुका अंमलबजावणी बाबत खूपच मागे असल्याचे सांगत झालेल्या अक्षम्य दिरंगाईबाबत उघड नाराजी व्यक्त केली. यामुळे प्रशासन तालुक्याकडे चोख व्यवस्थेसाठी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले.

 यावेळी प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रभाकर भावठाणकर, नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी, पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.आशिष शिरसे, गटविकास अधिकारी आर.दिघे, जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे, सभापती प्रणाली चिले, नगराध्यक्षा आरती तलार, माजी सभापती भाई पोस्टुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण उपस्थित होते.

हेही वाचा- ...तर जगभरातील कोरोना संकट होईल दूर    

     प्रशासनाच्या अमंलबजावणी दिरंगाई बाबत नाराजी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेताना तालुक्यात काय उपाययोजना आणि नियोजन केले याची माहिती करून घेतली. मुंबई, पुण्यातून किंवा अन्य रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस विलगिकरण करत कोरोन्टाईन करण्याच्या सूचना दिल्या. ही सर्व आपलीच माणसं असून त्यांच्या व इतरांच्या आरोग्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे सांगत खबरदारी घेण्यास सांगताना बाहेरून येणाऱ्यांची पूर्ण तपासणी करावीच असे स्पष्ट केले. ग्रामीण भागात नियमित आरोग्य तपासण्या कराव्यात, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला, नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी योग्य ती सतर्कता आणि उपाययोजना कराव्यात असे सांगितले.

अन्नधान्य पुरवठा व उपाययोजना करण्यासाठी आपत्कालीन निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यातून खर्च करण्यात यावा. मोठ्या संख्येने मुंबईकर गावी आल्याने मे महिन्यात पाणी टंचाई भासणार असल्याने ग्रामीण स्तरावर टंचाईचे योग्य नियोजन व त्यासाठी माहिती संकलित करण्याचे सांगितले. आंबा वाहतूक, रेशन धान्य याबाबत चर्चा करून अधिकाऱ्यांना योग्य सूचना केल्या. आगामी मे महिन्यात शेतीच्या पेरणी कामांना वेग येणार असल्याने गटविकास अधिकाऱ्यांना बियाणे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे सांगितले.

हेही वाचा-या व्यावसायीतील सत्तावीस हजार मजूर आर्थिक दुष्टचक्रात                              

शिवभोजन थाळी कागदावरच
  राज्यात सर्वत्र सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी मंडणगडमध्ये अजूनही फक्त कागदावरच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. याबाबत जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे यांनी मजुरांच्या गरजांचा विषय उपस्थित करून शिवभोजन थाळी अजूनही सुरू झालेली नसल्याचे सांगितले. तसेच खासदार सुनील तटकरे यांनी जनधन योजने अंतर्गत किती खातेदारांना लाभ मिळाला? उज्वला गॅसचे लाभार्थी किती आहेत? बांधकाम मजुरांचा तपशील याची विचारणा केली असता अपेक्षित आकडेवारी लगेचच प्राप्त झाली नाही. यामुळे प्रशासनाच्या कामांबाबत नाराजी व्यक्त करताना मंडणगड खूप मागे असल्याचे सांगितले. उद्या ता.२२ एप्रिल संध्याकाळ पर्यंत शिवभोजन थाळी सुरू करावीच असे स्पष्ट केले.

हेही वाचा-ग्रामपंचायत कार्य‍ालयाएेवजी अधिकारी गेले चिंचेच्या बागेत                          

तोपर्यंत अन्य राज्यातील मजुरांची जबाबदारी आपलीच.
तालुक्यात अन्य राज्यातून आलेले मजूर गावाकडे जाण्यासाठी इच्छुक असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांनी प्रश्न उपस्थित करताच, खासदार यांनी जो पर्यंत राज्य शासन अन्य राज्यातील मजुरांना लॉक डाऊनमध्ये पाठवण्याची व्यवस्था किंवा संमती देत नाही तोपर्यंत त्यांची जबाबदारी आपलीच असल्याचे सांगत त्यांच्या जीवनावश्यक वस्तुंची व्यवस्था करण्याचे सांगितले. तसेच अन्य राज्यही याबाबत त्यांना येवून द्यावे अशी मागणीच करीत नसल्याचे स्पष्ट केले.  
          
पोलिस प्रशासनाने आपली भूमिका चोख करावी
 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता अधिक सतर्क राहून तालुक्यात कायदा व सुव्यवस्था याची चोख अंमलबजावणी करण्याचे निर्देश खासदारांनी दिले. नियमांचे उल्लंघन कोणी करू नये यासाठी बंदोबस्तात वाढ करावी असे सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Zero Circle in mandangad kokan marathi news