जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक रुग्ण, जनता कर्फ्यूसाठी दबाव, कोणता हा तालुका?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

तालुक्‍यातील बहुतांशी गावांत संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2520 बाधित आढळले आहेत. यात तालुक्‍यातील रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः नागरी क्षेत्रात कोरोना संक्रमित रुग्ण आढळू लागल्याने कणकवलीसारख्या शहरामध्ये "जनता कर्फ्यू'साठी दबाव वाढू लागला आहे. 
तालुक्‍यात आतापर्यंत 858 रुग्ण आढळले असून हा आकडा जिल्ह्यात सर्वाधिक आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण तालुक्‍यात आढळला होता. त्यानंतर सातत्याने रुग्ण आढळू लागले. गणेशोत्सवानंतर हा आकडा झपाट्याने वाढला आहे. तालुक्‍यातील बहुतांशी गावांत संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2520 बाधित आढळले आहेत. यात तालुक्‍यातील रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. 

गर्दीच्या ठिकाणांमुळे समूह संसर्ग होत आहे. त्यामुळे किमान 14 दिवसांचा "जनता कर्फ्यू' जाहीर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी जनता कर्फ्यूसाठी आवाहन केले आहे. गणेशोत्सव, त्यानंतर पितृपक्ष संपत आहे. पुढचा एक महिना हा अधिक मास मानला जातो. त्यानंतर नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. नवरात्रोत्सवासह भात कापणीचा हंगाम सुरू होणार असल्याने नागरिक घराबाहेर पडणार आहेत. त्यामुळे जनता कर्फ्यूसाठी जोर वाढू लागला आहे. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या इतर नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 50 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील 80 टक्के रुग्ण ज्येष्ठ होते. कणकवलीचा हा आकडा भयभीत करणारा आहे. त्यामुळे "जनता कर्फ्यू' आवश्‍यक आहे. 
- सीताराम ऊर्फ दादा कुडतरकर, जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ 

 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's patients grew in kankavli taluka