देवगडात एसटीचा प्रवास अद्याप खडतरच 

संतोष कुळकर्णी
Monday, 21 September 2020

गेल्यावर्षी याच दिवशी प्रतिकिलोमीटर 28 रूपये 90 पैसे इतके उत्पन्न होते. म्हणजे यंदाचे उत्पन्न सरासरी निम्यावर आहे.

देवगड (सिंधुदुर्ग) - लॉकडाउननंतर एसटी फेऱ्या सुरू झाल्या असल्या तरीही येथे अद्याप एसटीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. आधीच लॉकडाउनमध्ये एसटी बंद राहिल्याने महामंडळ अडचणीत असतानाच आता गाड्या सुरू झाल्यानंतरही प्रतिदिन होणारा खर्च आणि येणारे प्रवाशी उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोना काळात एसटीचा खडतर प्रवास सुरूच आहे. 

कोरोनामुळे अनेक उद्योग व्यवसाय अडचणीत सापडले असताना त्याचा फटका एसटी सेवेलाही बसला. लॉकडाउनमध्ये एसटी सेवा बंद झाली. सेवा कोलमडल्याने नेहमी गजबजलेला एसटी परिसर सुनासुना भासू लागला. आता एसटी सेवा सुरू होत असली तरीही प्रवाशांकडून अद्याप त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. सध्या देवगड आगाराचा विचार करता प्रतिकिलोमीटर 14 रूपये 49 पैसे इतके उत्पन्न आहे.

गेल्यावर्षी याच दिवशी प्रतिकिलोमीटर 28 रूपये 90 पैसे इतके उत्पन्न होते. म्हणजे यंदाचे उत्पन्न सरासरी निम्यावर आहे. अजून शाळा, महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. एसटी गाड्याही अद्याप पूर्ण क्षमतेने धावत नाहीत. सध्या ग्रामीण भागात धावणाऱ्या गाड्यांनाही पुरेसे भारमान नसल्याचे दिसून येत आहे. दिवसभराचा इंधनावरील खर्च आणि येणारे उत्पन्न याचा विचार केला तरीही त्याचे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसत आहे. शिवाय कर्मचारी पगार, गाड्यांची देखभाल दुरूस्ती खर्च, गाड्यांच्या स्वच्छतेचा खर्च इतर व्यवस्थापन खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजूनही एसटी गाड्या प्रवाशांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहेत. 

उत्पन्न तपशील (19 सप्टेंबर पर्यंत) 
*2020 *2019 
एसटी फेऱ्या 85 *294 
एकूण किलोमीटर 5 हजार 462.07 *15 हजार 955.07 
प्रवाशी उत्पन्न 79 हजार 44 रूपये *4 लाख 61 हजार 150 
प्रतिकिलोमीटर उत्पन्न 14 रूपये 49 पैसे *28 रूपये 90 पैसे.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact devgad st depot