पहिला बळी, एकच खळबळ, आता शहरात भीतीचे वातावरण

प्रभाकर धुरी
Tuesday, 15 September 2020

निम्मे स्वॅब हे रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे आहेत. 
काल तब्बल 22 जण बाधित आढळले होते. त्यांच्या संपर्कातील काही जणांचे स्वॅब आज तपासणीसाठी पाठविले आहेत.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - कोरोनाने आज शहरात तालुक्‍यातील पहिला बळी घेतला. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे तर तालुक्‍यात भीतीचे वातावरण आहे. सुरुचीवाडी येथील "ती' व्यक्ती बॅंक कर्मचारी होती. त्यांची कोरोना चाचणी 3 सप्टेंबरला पॉझिटिव्ह आली होती. त्यांना मधुमेह असल्याने येथील आयटीआयमधील कोविड केअर सेंटरमध्ये न ठेवता ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. 

याबाबत खातरजमा करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी रमेश कर्तसकर यांच्याशी संपर्क साधला; पण त्यांनी अद्याप आपल्याला अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. तर येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्‍वर ऐवाळे यांनी जिल्हा रूग्णालयाशी संपर्क साधून अधिकृत माहिती दिली. येथील ग्रामीण रुग्णालयात काल दोन कर्मचारी बाधित आढळल्याने रुग्णालय अतितातडीचे रुग्ण वगळून अन्य रुग्णांसाठी आजपासून तीन दिवस बंद ठेवले आहे. वैद्यकीय अधीक्षक ऐवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज चौघांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. 44 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी स्वॅब घेतले आहेत. त्यातील निम्मे स्वॅब हे रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे आहेत. 
काल तब्बल 22 जण बाधित आढळले होते. त्यांच्या संपर्कातील काही जणांचे स्वॅब आज तपासणीसाठी पाठविले आहेत. 

तालुक्‍यातील पहिला आणि तालुका आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेतील दुसरा बळी आज गेला. डेगवे आंबेखण येथील एकाचा मृत्यू काल झाला होता तर आज दोडामार्ग सुरुचीवाडी येथील एकाचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेहाचाही आजार होता. ते येथील खासगी बॅंकेत कामाला होते. त्यांचे मूळ घर शहरात गावडेवाडी येथे असले तरी ते सुरुचीवाडी येथे राहात होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले, असा परिवार आहे. बॅंकेत गेलेल्या सर्वांशी ते प्रेमाने वागत, अडले नडलेल्यांना सतत मदत करत. त्यामुळे ते सर्वांचे लाडके होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच तालुक्‍यातील अनेकांनी शोक व्यक्त केला. कळणे नूतनवाडी येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने सरपंच जान्हवी देसाई, ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई, व्यापारी बांधव आणि ग्रामस्थांनी काल बैठक घेवून आज बाजारपेठ बंद ठेवली होती. 

दृष्टीक्षेपात

- दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय आजपासून तीन दिवस बंद 
- दोडामार्ग शहरात कोरोनाचा पहिला बळी 
- नगराध्यक्ष लीना कुबल, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, तालुकाप्रमुख श्रेयाली गवस यांची जनता कर्फ्यूची मागणी 
- कळणे बाजारपेठ दिवसभर बंद 
- चोवीस तासांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact dodamarg sindhudurg district