अरे व्वा! सिंधुदुर्गसाठी आनंदाची बातमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

अशा प्रकारे संदेश प्रसारीत केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाने दिले आहेत. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्हा रुग्णालयाने पाठवलेले आणखी पाच अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णासोबत कोचीवेल्ली एक्‍सप्रेसमधून प्रवास केलेल्या व्यक्तींचेही अहवाल निगेटीव्ह आहेत. रुग्णालयाने पाठवलेल्या 63 पैकी फक्त एका नमुन्याचा अहवाल बाकी असून इतर सर्व अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये नव्याने एकही अहवाल पॉझिटीव्ह आलेला नाही. 

जिल्ह्यात संचारबंदी असतानाही विनाकारण दुचाकीवरुन फिरणाऱ्यांवर 18 गुन्हे दाखल करण्यात आले असून 16 वाहने जप्त करण्यात आली आहेत. व्हॉट्‌सऍप आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे संदेश कोणाही प्रसारीत करू नयेत, अशा प्रकारे संदेश प्रसारीत केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाने दिले आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडॉऊन केले आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अनेक मजूर, कामगार, बेघर यांच्या राहण्याची व जेवणाची अडचण निर्माण झाली होती. या सर्वांच्या जेवणाची व निवासाची सोय व्हावी, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने 15 कॅम्प उभारले आहेत. या कॅम्पमध्ये सुमारे साडे पाचशे मजूर, बेघर यांच्या निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे; पण अडकून पडल्यामुळे यांच्यावर मानसिक ताण येत आहे. त्यांचा हा मानसिक ताण कमी करण्यासाठी या लोकांचे सामुपदेशन करण्यात येत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत महिला व बाल विकास अधिकारी यांनी नेमणूक केलेल्या 6 सामुपदेशकांनी 48 व्यक्तींचे सामुपदेशन केले आहे. या सामुपदेशनामध्ये वैयक्तीक संवाद साधून कोरोना विषाणूचे संक्रमण थांबविण्याचे उपाय, घ्यावयाची काळजी, घरच्यांची वाटणारी चिंता, सकारात्मक वेळ कसा घालवावा, स्वच्छतेबाबतच्या सवयी, मास्क, साबण, हॅन्डवॉशचा वापर, वाचन करणे या विषयी सामुपदेशन करण्यात आले. सामुपदेशन करण्यात आलेल्या सर्वांची मानसिक स्थिती सध्या चांगली आहे. ज्यांना गरज भासत आहे, अशा लोकांचे सामुपदेशन करण्यात येत आहे. सामुपदेशनासाठी 02362-228869 या हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

22 व्यक्‍ती विलगिकरण कक्षात 
विलगीकरण कक्षामध्ये सध्या 22 व्यक्ती दाखल आहेत. 337 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये 53 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. अलगीकरणाचा कालावधी संपवलेल्या व्यक्तींची संख्या 80 आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण 2010 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact konkan sindhudurg