कोरोनाबाबत अपडेट मिळेना, कुणाचा कुणाला ताळमेळ लागेना

भूषण आरोसकर
Monday, 27 July 2020

एकूणच यावरून प्रशासनात ताळमेळ नसल्याचे दिसून येत असून सावंतवाडीतील जागृत नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील कोरोनाबाबत संबंधित प्रशासनामध्ये ताळमेळ नसल्याने योग्य माहिती मिळविताना अडचणी येत आहेत. उपजिल्हा रुग्णालय व पालिका आरोग्य यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने नेमकी जबाबदारी कोणाची? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे.

अलीकडेच आलेल्या दाम्पत्याच्या संपर्कातील अन्य सहा जण पॉझिटिव्ह आल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे; मात्र यासंदर्भातील माहिती मिळवताना पालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडे काहीच माहिती उपलब्ध होत नाही. शहरात रुग्ण सापडत असताना त्यांच्या संपर्कात किती जण आले? किती लोकांनी स्वॅब तपासणीसाठी दिले? याबाबत स्थानिक प्रशासनन म्हणुन पालिकेकडे माहिती असणे आवश्‍यक आहे; मात्र पालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडे काहीच माहिती उपलब्ध होत नसल्याचे समोर आले. 

शहराचे नोडल अधिकारी असलेले डॉ. उमेश मसुरकर यांच्याकडून या संदर्भात माहिती जाणून घेतली असता ते म्हणाले, ""शहरातील किती जणांनी स्वॅब दिला व कितीजण हायरिक्‍स व लोरिक्‍समधील आहेत यांची माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त असणार आहे.'' उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की आमची यंत्रणा संपुर्ण तालुक्‍यातुन येणाऱ्या व क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेते.

मुळात पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम असताना त्यांनी शहरातील कोरोना अपडेटबाबत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शहरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचा सर्व्हे करणे हे उपजिल्हा रुग्णालयासह पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे काम आहे. रोज स्वॅब देण्यासाठी लोक येतात. यात शहरातील व्यक्तीबरोबर तालुक्‍यातीलही व्यक्ती आहेत. त्यामुळे शहरातील किती लोकांनी स्वॅब दिला हे पाहणे काम नाही. याबाबत शहराच्या नोडल अधिकाऱ्यांजवळ माहिती असणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले. एकूणच यावरून प्रशासनात ताळमेळ नसल्याचे दिसून येत असून सावंतवाडीतील जागृत नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. 

नगराध्यक्षांची भूमिका महत्त्वाची 
एकूणच शहरात कोरोना रुग्ण सापडत असताना पालिका आरोग्य यंत्रणा व उपजिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेत समन्वय नसल्याचे दिसुन येते. अशाच प्रकारे दोघांनी एकमेकांकडे बोट दाखविल्यास व जबाबदारी टाळल्यास शहरातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. नगराध्यक्ष संजू परब यांनी याबाबत जातीनिशी लक्ष घालून दोन्ही यंत्रणेत समन्वय घडवून आणणे गरजेचे आहे, असे मत काहींनी व्यक्त केले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact konkan sindhudurg